मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) मुंबईतील कुष्ठपीडित अपंगांना पालिकेकडून लवकरच दरमहा एक हजाराचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात ५0 लाख रुपयांची तरतूद केली आहे.
याबाबतचा प्रस्ताव बुधवारी पालिकेच्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येणार आहे. मात्र हे एक हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी संबंधितांना काही अटी व शर्ती पाळाव्या लागणार आहेत. कुष्ठपीडित अपंगांना अर्थसहाय्य देण्यासाठी लाभार्थी निश्चित करण्यासाठी वैद्यकीय तपासणीचा अहवाल बनवण्यासाठी पालिकेच्या अँक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकार्यांसह पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. केसकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने सात अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत.
अर्जदाराचे मुंबईत वास्तव्य हवे, अर्जदाराचे वय अर्ज सादर करण्याच्या तारखेपर्यंत १८ वर्षे पूर्ण हवे, कुष्ठरोगामुळे ४0 टक्के अपंगत्वाबाबतचे सरकारी किंवा निमसरकारी रुग्णालयाचे प्रमाणपत्र सादर करावे, अर्थसहाय्य मिळणार्या लाभधारकास दरवर्षी नोव्हेंबरमध्ये हयातीचा दाखला वडाळ्याच्या अँक्वर्थ महापालिका कुष्ठरोग रुग्णालयात जमा करावा लागेल, कुष्ठपीडितांचे एक हजार रुपयांचे अर्थसहाय्य ईसीएसने राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यात जमा करण्यात येईल, कार्यकारी आरोग्य अधिकार्यांच्या मंजुरीनंतरच हे अर्थसहाय्य मिळणार आहे.
