मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) वरळी येथील कॅम्पा कोला कम्पाऊंडमधील इमारतीच्या बेकायदा मजल्यावरील रहिवाशांच्या पाठीशी गानसम्राज्ञी लता मंगेशकर उभ्या राहिल्या आहेत. ‘बिल्डरच्या चुकीच्या शिक्षा येथील रहिवाशांना नको’, असे लतादीदी यांनी सोशल नेटवर्क साईटस ट्विटवर ट्विट करत कॅम्पाकोलाच्या रहिवाशांना पाठीशी घातले आहे.
मागील आठवडयातील मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने कॅम्पा कोलाच्या रहिवाशांची याचिका फेटाळून लावली होती. परिणामी येथील इमारतीमधील बेकायदा मजल्यावरील रहिवाशांनी सदनिका रिकाम्या करण्यास सुरुवात केली होती. शिवाय तात्पुरता निवारा म्हणून कॅम्पा कोला कम्पाऊंमध्ये तंबूही ठोकला. मात्र महापालिका प्रशासनाने तंबूलाही नोटीस पाठविली. परंतू यावर पुन्हा रहिवाशांनी तंबूला पावसाळ्यात अभय द्यावे, असे विनंतीपर पत्र जी-नॉर्थच्या सहाय्यक अभियत्यांना धाडले. मात्र त्यावर विनंतीपर पत्रालाही पालिकेने काहीच उत्तर दिले नाही.
त्यात रविवारी (८ जून) येथील रहिवासी चक्रवर्ती चावला (८३) या ज्येष्ठ नागरिकांचे निधन झाले. चक्रवर्ती यांचा मृत्यू कारवाईच्या धसक्याने झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला. शिवाय मागील पाच महिन्यांत तीन जणांचे निधन झाल्याचे कॅम्पाकोलाच्या प्रवक्त्या नंदिनी मेहता यांनी सांगितले.
तोच सोमवारी लतादीदी यांनी कॅम्पाकोला रहिवाशांच्या बाजूने ट्विट केले असून; यात त्या म्हणतात, कॅम्पा कोला प्रकरणात मला महाराष्ट्र सरकारला एक गोष्ट ध्यानात आणून द्यायची आहे. ती अशी की, येथील घरे तोडण्यात आली तर हजारो लोक बेघर होतील. ज्यात अनेक लहाने मुले आणि वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे. आजवर येथील तीन व्यक्तींचे कारवाईच्या धसक्याने निधन झाले आहे. बिल्डरच्या चुकीची शिक्षा सर्वसामान्य माणसाला भोगावी लागणे; म्हणजे अन्याय आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासन सोमवारी कॅम्पाकोलाच्या रहिवाशांना नोटीस बजाविणार होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत अद्याप पालिका प्रशासनाला प्राप्त झालेली नाही. परिणामी रहिवाशांना नोटीस बजाविण्यात आलेली नाही. मात्र असे असले तरी मागील आठवडयातच आयुक्त स्तरावर झालेल्या बैठकीत सोमवारनंतर (९ जून) पुढील ७२ तासांची मुदत रहिवाशांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि त्यानंतर गुरुवारी (१२ जून) पालिका प्रशासन येथील प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करणार आहे.
