दोन घरे घेणाऱ्यांवर कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दोन घरे घेणाऱ्यांवर कारवाई

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकार कोट्यातून दोन घरे मिळालेल्यांनी दुसरे घर सरकारला परत केले तरीही त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली जाणार नाही. तसेच त्यांनी दुसरे घर विकले तर त्याचे बाजारमूल्य त्यांच्याकडून वसूल केले जाईल, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली. 
या प्रकरणी पत्रकार केतन तिरोडकर यांनी सादर केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी आज न्या. अभय ओक व न्या. ए. एस. चांदूरकर यांच्यासमोर झाली. त्या वेळी नगरविकास खात्याचे उपसचिव एस. के. सालीमठ यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले. अशी दोन घरे मिळालेल्यांनी दुसरे घर परत केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही, असे विधान सरकारच्या 30 एप्रिलच्या प्रतिज्ञापत्रात होते. ते विधान मागे घेतल्याचे आजच्या प्रतिज्ञापत्राद्वारे सरकारने जाहीर केले आहे. 

ज्यांनी या कोट्यातून दोन घरे घेतली आहेत, त्यांना झालेले दुसऱ्या घराचे वाटप रद्द केले जाईल. तसेच अशा लाभार्थींनी दुसरे घर विकले असेल तर त्यांच्याकडून त्या घराच्या विक्रीचे बाजारमूल्य वसूल केले जाईल. त्याचप्रमाणे आपल्याकडे एकही घर नाही, अशा आशयाचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याबद्दल या लाभार्थींवर गुन्हा दाखल केला जाईल, असेही आजच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

वरील आदेशाची अंमलबजावणी कशी काय केली, याचा तपशील सादर करावा, असेही निर्देश खंडपीठाने आज दिले. या विषयासंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिल्यावर सरकारने कोणालाही मुख्यमंत्री कोट्यातून घरे दिली नाहीत, असेही सरकारतर्फे आज सांगण्यात आले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages