देशातील सर्वात मोठी अशी महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे. एका लहान राज्याचा अर्थसंकल्पापेक्षा मोठ्या प्रमाणात अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेचा आहे. मुंबईकर नागरिकांकडून पालिका विविध कर वसूल करत आहे. असे असताना मुंबईकर नागरिकांना ज्या प्रमाणात नागरी सुविधा मिळायला हव्यात त्याप्रमाणात सुविधा मिळतच नसल्याचे समोर आले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या एकूण सोळा रुग्णालयांद्वारे मुंबईकर नागरिकांना आरोग्य सेवा पुरवत आहे. या सोळा रुग्णालयांपैकी सायन, नायर आणि राजावाडी या तीन रुग्णालयामध्ये गेल्या १३ वर्षामध्ये १ लाख ९ हजार ८७१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्का दायकबाब माहिती अधिकारातून समोर आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधून किती लोकांवर उपचार करण्यात आले, किती रुग्ण उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल झाले, इत्यादीची माहिती आनंद पारगावकर यांनी मागवली होती. माहिती मुंबई महानगरपालिकेशी संबंधित सर्व रुग्णालयांची मागितली असताना फक्त तीन रुग्णालयांनी याबाबत माहिती देण्याचे धाडस दाखवले आहे. सर्वात आधी सायन आणि नायर या दोन रुग्णालयांनी दिलेल्या माहिती नुसार सन २००१ ते २०१३ या १३ वर्षाच्या कालावधीत नायर रुग्णालयामध्ये ८६ लाख ८६ हजार ९२२ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. ३३ लाख ६ हजार ९४३ रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यापैकी २९ हजार ६५० रुग्णांचा गेल्या १३ वर्षामध्ये मृत्यू झालेला आहे.
सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये २००१ ते २०१४ या १३ वर्षात १ करोड ९१ लाख ९७ हजार ६८ रुग्णांनी उपचार घेतले असून ६३ हजार ३१३ रुग्णांचा मृत्यू विविध कारणांनी झाला आहे. जानेवारी २०१४ - फेब्रुवारी २०१४ या दोन महिन्यात २ लाख १३ हजार ९०७ रुग्णांनी उपचार घेतले असून त्यापैकी ८९४ लोकांचा मृत्यू झालेला आहे . सायन आणि नायर या दोन रुग्णालात गेल्या १३ वर्षामध्ये अद्याप ९४ हजार लोकांचा मृत्य झाला आहे. नुकतीच राजावाडी रुग्णालयाची माहिती समोर आली असून राजावाडी मध्ये ५५ लाख ९५ हजार १५६ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते त्यापैकी १६ हजार १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पालिकेच्या सर्वात मोठ्या अश्या तीन रुग्णालयांमध्ये १ लाख ९ हजार ८७१ रुग्णांचा मृत्यू गेल्या १३ वर्षांमध्ये झाला असेल तर इतर १४ रुग्णालयांमधून किती रुग्णांचा मृत्यू झाला असेल याचा विचार न केलेलाच बरा. मुंबई महानगर पालिका आयुक्त, संबंधित अतिरिक्त पालिका आयुक्त तसेच पालिकेमधील सत्ताधारी यांचे रुग्णालये आणि रुग्ण यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच या १ लाख १० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे असेच म्हणावे लागेल. मुंबई मधील सायन, नायर आणि राजावाडी हि तीन रुग्णालये सर्वात मोठी रुग्णालये असून सर्व सुविधा असताना इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णालयात लोकांचा मृत्यू होणे म्हणजे मुंबई महानगरपालिकेसाठी शरमेची बाब आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयांमधून मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू होत असल्याने पालिकेची रुग्णालये मृत्यूचा सापळा बनत आहेत कि काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेच्या रुग्णालयांमधून रुग्णांचा मोठ्या प्रमाणत मृत्यू होत असल्याने पालिकेतील सत्तधारी, पालिका आयुक्त, अतिरिक्त पालिका आयुक्त यांनी स्वत लक्ष देवून रुग्णालयातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे आवाहन आम्ही याच सदरातून ८ एप्रिल २०१४ च्या लेखा मधून केले होते. तसेच हि आकडेवारी विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध सुद्धा झाली होती. परंतू म्हणावी तशी पालिकेमधील सत्ताधारी आणि प्रशासनाने या रुग्णांच्या मृत्यूची दखल घेतलेली नाही.
मागील आठवड्यात राजावाडी रुग्णालयामधील रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधी पक्षाला मात्र त्याची जाग आली आणि पालिकेच्या स्थायी समिती मध्ये याबाबत चर्चा घडवून या रुग्णांच्या मृत्यूचा जाब विचारण्यात आला. यावेळी येथे डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी यांची कमतरता आहे. तसेच येथे चांगल्या सुविधा नसून औषधेही मिळत नाहीत. रुग्णालयांचे प्लॅस्टर पडत आहे आणि छतही खराब झाले आहे. तिच अवस्था केईएम आणि शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाची झाली आहे. यामुळे तीनही रुग्णालयांवर ताण येतो, याकडे छेडा, लांडे आणि पिसाळ यांनी लक्ष वेधले होते.
या रुग्णालयाची दुरवस्था झाली असून त्यात तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. राजावाडी रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत विशेष बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी या सदस्यांनी केली. यावर मुंबई शहर भागात नैसर्गिक आणि आजाराने दररोज सात जणांचा मृत्यू होतो तर उपनगरात दररोज पाच ते सहा जणांचा मृत्यू होतो. राजावाडी रुग्णालयात सन २0१३-१४ मध्ये १00८ रुग्ण दगावले आहेत. या रुग्णालयात ५८0 खाटा असल्या तरी ८0 खाटा वापरात नाहीत आणि येथे दररोज १ हजार ६00 रुग्णांची नोंद होते. महापालिकेला लवकरच ४८0 शिकाऊ डॉक्टर मिळणार आहेत. त्यापैकी ५0 टक्के शिकाऊ डॉक्टर उपनगरातील रुग्णालयात आणि ५0 टक्के डॉक्टर शहरातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी स्थायी समितीमध्ये दिली आहे.
पालिकेच्या रुग्णालयामध्ये नवीन शिकावू डॉक्टर देवून प्रश्न सुटणार आहे का? शिकावू डॉक्टर वाढवून पालिका आपले हात झटकण्याचा प्रयत्न करत आहे. पालिकेच्या रुग्णालयात इतके वर्षे प्रशिक्षित, शिकावू डॉक्टर आणि इतर कर्मचारी होते त्यांनी कोणती अशी चांगली सुविधा दिली कि ज्यामुळे १ लाख १० हजार रुग्णांचा मृत्यू झाला याची चौकशी व्हायला हवी. मृत पावलेले रुग्ण पालिकेला व शासनाला कर भरणारे होते यामुळे यांच्या मृत्यूचा जाब पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाला द्यावाच लागणार आहे. रुग्णालयामध्ये असलेल्या सुविधा रुग्णांना योग्य प्रकारे मिळतात कि नाही, मुंबईकर नागरिकांकडून कर रूपाने जो पैसा पालिकेला मिळतो त्यामधून पगार घेणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचारयाना पालिका आपली जबाबदारी काय आहे याची जाणीव करून देणार आहे कि नाही ?
पालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात फेरफटका मारल्यास रुग्णांची सर्व एक्सरे, ब्लडटेस्ट, रुग्णाची ने आण करणे अशी कामे नातेवाईकांना करावी लागतात. नर्स असतात पण मोबाईल वर किवा सहकाऱ्याबरोबर गप्प मारण्यात दंग असतात. एखाद्या पेशंटवर उपचार करताना आंम्ही तुमच्यावर उपकार करत आहोत अश्या भावनेतून पेशंट बरोबर उद्धट पद्धतीने वागणूक दिली जाते. डॉक्टर कुठे आहेत असा पेशंटच्या नातेवाईकांना रुग्णालयामध्ये शोध घ्यावा लागतो. रात्रीच्या पाळीमधील डॉक्टरांचे आणि नर्सचे पेशंटला वाऱ्यावर टाकून कोणते गंभीर बोलणे चालू असते. या सर्व प्रकारांकडे पालिकेच्या वातानुकुलीत चेंबर मध्ये बसलेल्या महापौर, आयुक्त आणि आरोग्य समिती अध्यक्षांचे दुर्लक्ष होत आहे.
पालिकेच्या रुग्णालयामध्ये कोणते प्रकार चालतात, पेशंटला त्यांच्या नातेवाईकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, मुंबईकर नागरिक जो पालिकेला कर देतात त्या कर रुपामधून गलेलट्ठ पगार घेणारे रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी कोणत्या प्रकारची सेवा त्या रुग्णांना देतात याची चौकशी करण्याची गरज आहे. वातानुकुलीत चेंबर मध्ये बसणाऱ्या महापौर, आयुक्त व आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी रात्री अपरात्री, ओ. पी. डी. मध्ये रुग्णांची गर्दी असताना रुग्णालय प्रशासनाला कोणतीही माहिती न देता धाडी घालण्याची आवश्यकता आहे.
अश्या धाडी टाकल्याने आपले वरिष्ठ अधिकारी कधीही येवू शकतात या भीतीने तरी रुग्णांना चांगली सेवा मिळू शकते. रुग्णालयामध्ये कोणत्या सोयींची, उपकरणांची कमी आहे, रुग्णालयामध्ये आणखी किती सुविधा वाढवण्याची गरज आहे हे वरिष्ठ अधिकारी आणि सत्ताधार्यांना समजल्यास रुग्णांना चांगल्या सुविधा मिळू शकतील. सत्ताधारी , वरिष्ठ अधिकार्यांच्या भीती मुळे डॉक्टर आणि कर्मचार्यांकडून रुग्णांना चांगली वागणूक तसेच वेळेवर उपचार मिळाल्यामुळे पालिका रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करता येवू शकते.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३

No comments:
Post a Comment