बारा वर्षांखालील मुलांसाठी शनिवार आणि रविवार मोफत प्रवास, कोणत्याही दोन स्टेशनांच्या दरम्यान दहा ऐवजी पाच रुपये अशा सवलती देणाऱ्या मेट्राने आता या दिवशी परतीच्या तिकिटाचीही सोय केली आहे.
मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना परतीचे तिकीट मिळत नाही. परतीच्या प्रवासासाठी तिकीट काढण्यासाठी पुन्हा रांगेत उभे रहावे लागते. शनिवारी आणि रविवारी मात्र २० रुपयांत रिटर्न तिकीट देण्याची सोय मेट्रोने उपलब्ध करून दिली आहे. विविध रंगाची दोन तिकिटे प्रवाशांना दिली जातील. त्यापैकी एक तिकीट जाण्यासाठी असेल, तर दुसरे परतीच्या प्रवासाचे असेल.
बारा वर्षाखालील मुलांसाठी शनिवार आणि रविवारी मोफत प्रवासाची सुविधा या आठवड्यातही कायम ठेवण्यात आली आहे. मागील आठवड्यात अनेक मुलांनी पालकांसह मेट्रोसफर अनुभवली होती. त्यामुळे मेट्रोला चांगलीच गर्दी झाली होती. हा अनुभव लक्षात घेता या दोन्ही दिवशी अतिरिक्त कर्मचारी वर्ग तैनात ठेवला जाणार आहे.
