उपनगरांतील रुग्णालयांत लवकरच वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उपनगरांतील रुग्णालयांत लवकरच वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती

Share This
मुंबई - मुंबईच्या पूर्व आणि पश्‍चिम उपनगरांतील पालिका रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. उपनगरात असलेल्या महापालिकेच्या 18 रुग्णालयांमध्ये ही भरती करण्यात येणार आहे. 
उपनगरातील रुग्णालयांमध्ये असलेला सुविधांचा अभाव आणि डॉक्‍टरांची कमतरता यामुळे उपनगरातील रुग्ण मुंबईतील जे. जे., केईएम, सायन, नायर या रुग्णालयांमध्ये येतात. परिणामी या रुग्णालयांवरील ताण वाढतो; तसेच रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांवरही त्याचा परिणाम होतो. यामुळे रुग्णांसोबत येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांची तारांबळ उडते. यावर तोडगा काढण्यासाठी ही भरती शक्‍य तितक्‍या लवकर करण्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रयत्न असल्याचे समजते. ऑगस्टअखेरपर्यंत ही पदे भरण्याचा आरोग्य विभागाचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

रुग्णालयातील खाटांच्या संख्येच्या प्रमाणात ही भरती होणार आहे. यामध्ये नेत्ररोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिव्यंगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, मेडिसिन विभाग अशा एकूण 6 विभागांतील डॉक्‍टरांची नेमणूक करण्यात येणार आहे. उपनगरीय रुग्णालयांतील एकूण 400 पदे रिक्त असून, पहिल्या टप्प्यात 230 जागांची भरती झाल्यानंतर रुग्णालयाची पाहणी करून पुढील भरतीचा कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages