रिक्षा फेरीवाल्यांचा मोर्चा - पालिकांची कामे रविवार पासून बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 June 2014

रिक्षा फेरीवाल्यांचा मोर्चा - पालिकांची कामे रविवार पासून बंद

मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comहकीम समितीने दिलेल्या अहवालानुसार दरवर्षी १ मे रोजी रिक्षा-टॅक्सीच्या प्रवासभाड्यात वाढ दिली पाहिजे. परंतु राज्य शासनाने गेल्या दोन वर्षांपासून रिक्षा-टॅक्सीच्या प्रवासभाड्यात कोणतीही वाढ केलेली नाही, त्यामुळे रिक्षाला किमान १८ रुपये प्रवासभाडे देण्यात यावे, या मागणीसाठी येत्या २१ जूनपासून राज्यातील रिक्षाचालक-मालक संपावर जाणार आहेत. 
हकीम समितीने राज्य शासनाला दिलेल्या अहवालानुसार, दरवर्षी १ मे रोजी राहणीमानाच्या दर्जानुसार रिक्षा-टॅक्सी प्रवासभाड्यात वाढ होणे आवश्यक आहे. राज्य शासनाने हकीम समितीचा अहवाल स्वीकारला असला तरी रिक्षा-टॅक्सीच्या प्रवास भाड्यात गेल्या २ वर्षांपासून कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने येत्या २0 जूनपर्यंत रिक्षाच्या प्रवास भाड्यात वाढ द्यावी, अशी मागणी मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनतर्फे करण्यात आली असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. युनियनतर्फे परिवहनमंत्री, परिवहन राज्यमंत्री, परिवहन आयुक्त, परिवहन विभागाचे प्रधान सचिव यांना १२ जून रोजी नोटीस देण्यात आली आहे. 

त्यामध्ये येत्या ७ दिवसांत ऑटोरिक्षाच्या प्रवासभाड्यात वाढ केली नाही तर शनिवार, २१ जून किंवा त्यानंतर राज्यातील सुमारे १५ लाख रिक्षाचालक-मालक संपावर जातील, असा इशारा शरद राव यांनी या वेळी दिला. राज्यातील रिक्षाचालक-मालक त्या त्या शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात परिवहन विभागाच्या कार्यालयासमोर मोर्चे, धरणे पद्धतीने तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती शरद राव यांनी या वेळी दिली. रिक्षाला किमान भाडे १८ रुपये, तर पुढील टप्प्यासाठी १२.२८ पैशांची वाढ देण्याची मागणी युनियनने केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील जनतेचा रिक्षा प्रवास महागणार असून रिक्षा संपाचा फटकाही जनतेला बसणार आहे.

२३ जूनला फेरीवाल्यांचा लाखांचा मोर्चाराष्ट्रीय फेरीवाला २00९ च्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २0१३ रोजी आदेश दिले आहेत. तसेच फेरीवाला कायदा २0१४ ची अंमलबजावणी आणि सद्य फेरीवाल्यांना जोपर्यंत लायसन्स दिली जात नाहीत तोपर्यंत त्यांना त्यांच्या सध्याच्या फेरीच्या धंद्याच्या जागेवरून हटवू नये, या मागणीसाठी राणीबाग ते मंत्रालय असा लाँग मार्च २३ जून रोजी दुपारी १२ वाजता काढण्याचा निर्णय नॅशनल हॉकर्स फेडरेशनने घेतला आहे. या मोर्चामध्ये लाखो फेरीवाले सहभागी होणार असल्यामुळे त्याला 'लाखांचा मोर्चा' असे संबोधण्यात आले आहे.

एलटीबी असणार्‍या पालिकांची कामे रविवारपासून बंद
रविवार, १५ जून रोजी पिंपरी-चिंचवड येथे एलटीबीविषयी बैठक होणार असून राज्य सरकारने एलटीबीऐवजी सरचार्ज आकारण्याचे धोरण राबविण्याचा निर्णय घेतला तर रविवारच्या मध्यरात्रीपासून राज्यातील सर्व महानगरपालिका आपले काम बंद करतील, असा इशारा कामगार नेते शरद राव यांनी दिला. त्यामुळे ज्या व्यापारी वर्गासाठी हा निर्णय राज्य सरकार घेत आहे त्या व्यापारी वर्गाने पालिकेची सर्व कामे करावीत, असेही राव यांनी या वेळी सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे नेते भरकटले आहेत, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.
JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS