मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघातात यकृत फुटले होते. अपघातात जबर धक्क्यामुळं त्यांना हार्ट अटॅक आला असल्याचे 'एम्स'च्या पोस्टमार्टम अहवालात म्हटले आहे. 'मुंडे यांचे यकृत फुटल्याने मोठ्या प्रमाणावर शरीरांतर्गत रक्तस्त्राव झाला होता. अपघातात जबर धक्का बसल्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आला. मात्र मुंडे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरावी अशी एकही खोल जखम त्यांच्या अंगाच्या बाह्य भागावर झाली नव्हती', असं या अहवालात म्हटलं आहे.
'एम्स'मधील डॉक्टरांच्या एका पथकाने मुंडे यांच्या शरीराचे पोस्टमार्टम केले. पोस्टमार्टम झाल्यानंतर मुंडे यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात नेण्यात आले होते. दुपारी १२.४० वाजता लष्कराच्या ट्रकमध्ये बसून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि मुंडे यांचे कुटुंबीय 'एम्स'मधून विमानतळाकडे रवाना झाले होते. एका एम्बुलन्समध्ये मुंडे यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. मुंडे यांच्या अपघातानंतर त्यांना तातडीने एम्समध्ये आणण्यात आले. येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असताना त्यांचा नियमित श्वासोच्छवास बंद होता. शिवाय रक्तदाबही बंद झाला होता. डॉक्टरांनी तब्बल अर्धा तास मुंडे यांना वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न केले. डॉक्टरांचे प्रयत्नांना यश आले नाही. अखेर ७.२० मिनिटांनी मुंडे यांना मृत घोषित करण्यात आले.
