मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) गोपीनाथ मुंडेंचे आकस्मिक निधन हा अपघात होता की घातपात, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. हा संशय व्यक्त होत असतानाच, महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच भाजपचे आमदार आणि मुंडेचे विश्वासू प्रकाश (अण्णा) शेंडगे यांनीही चौकशी व्हावी, असे म्हटले आहे.
गोपीनाथ मुंडें यांचा मृत्यू हा काही कुणी सामान्याचा मृत्यू नाही. संशयास्पद अशा या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी अशी महाराष्ट्र भाजपच्या वतीने मी मागणी करत आहे, असे ट्विट अवधूत वाघ यांनी केले आहे. मुंडेचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले प्रकाश (अण्णा) शेंडगे म्हणाले की, 'दिल्लीत सकाळी सहाच्या सुमारास फारशी गाड्यांची वर्दळ नसते. अशावेळी हा अपघात झाल्याने मनात संशय येतोच. त्यामुळे या अपघाताची सखोल चौकशी व्हावी. केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याने आज आम्ही मुंडेचा परळीत भव्य सत्कार करणार होतो. मात्र, आता हा सत्कार कधीच करता येणार नाही.'
