मुंबईत गुरुवारपासून २0 टक्के पाणीकपात सुरू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत गुरुवारपासून २0 टक्के पाणीकपात सुरू

Share This
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या जलाशयांतील पाणीसाठा आटल्यामुळे मुंबईत गुरुवारपासून २0 टक्के पाणीकपात करण्याची घोषणा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी केली. परिणामी मुंबईकरांची 'गुड मॉर्निंग' 'बॅड मॉर्निंग' होणार आहे. मुंबई, ठाणे आणि परिसरात पावसाने बुधवार सकाळपासून दमदार हजेरी लावली असल्यामुळे मुंबईकर सुखावले असले तरी जलाशयांच्या क्षेत्रात फक्त चार मिमी पाऊस पडल्याने ही कपात लागू करण्याचा निर्णय पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेतला. 
मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या जलाशयांमध्ये समाधानकारक पाऊस पडेपर्यंत आणि पाणीपुरवठा करणार्‍या तलावांतील पाण्याच्या साठय़ाने योग्य ती पातळी गाठेपर्यंत ही कपात कायम राहणार आहे. कपातीच्या काळात काही भागात विशेषत: डोंगराळ भागामध्ये पाणीपुरवठय़ासंबंधी रहिवाशांकडून तक्रारी आल्यास त्याचे निवारण करण्यासाठी पालिकेने शहर, पश्‍चिम आणि पूर्व उपनगरात नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत. बुधवारी पालिकेची स्थायी समितीची बैठक सुरू होताच अतिरिक्त आयुक्तांनी या संदर्भात निवेदन करणार असल्याचे सांगताच सर्व सदस्यांनी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी कान टवकारले. 'जूनमध्ये अत्यल्प पडलेला पाऊस, तलावातील सध्याचा पाणीसाठा पाहता मुंबईत २0 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र पाणीकपात करताना जलाशयांतील पाण्याची पातळी योग्य राहील व पाणीपुरवठय़ाचे वितरण आणि पाण्याचा दाब योग्य राहील याची काळजी घेण्यात येईल, असे देशमुख म्हणाले. 

कपातीच्या काळात पाणीपुरवठा वितरण यंत्रणेच्या शेवटच्या टोकांकडील भागांमध्ये व उंचावरील डोंगराळ भागात पाणीपुरवठय़ासंबंधी काही प्रमाणात तक्रारी येण्याची शक्यता देशमुख यांनी व्यक्त केली. मात्र तक्रारींचे निवारण लगेच करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या कपातीबाबत दर दहा दिवसांनी पाणीपुरवठा करणार्‍या जलाशयांतील असलेला पाण्याचा उपलब्ध साठय़ाचा आढावा घेऊन, कपातीबाबत पुढील धोरण ठरवले जाणार आहे. लोकांनी पाणी जपून वापरून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले. 

पाऊस न पडल्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावले असले तरी पालिकेने पाणी चोरी व पाणी गळतीमुळे वाया जाणार्‍या ३0 टक्के पाण्याविषयी गंभीरपणे उपाययोजना करणे आवश्यक आहे. दर महिन्याला प्रत्येक विभागातील पाणी चोरी व गळतीबाबतचा अहवाल सादर करावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते धनंजय पिसाळ म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर व मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनीही काही सूचना केल्या. पालिकेने पाणीकपात करताना विहिरी स्वच्छ करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना राबवणे आदी उपाययोजनांवर भर द्यावा, अशी सूचना केली. 

पालिकेच्या योग्य नियोजनाअभावी मुंबईकरांवर हे संकट ओढवले आहे, असा आरोपही विरोधकांनी केला. सभागृह नेत्या आणि समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी, 'रमजानचा महिना लक्षात घेता मुस्लिम वस्त्या आणि मशिदींमध्ये पाण्याची चोख व्यवस्था करावी, या वस्त्यांमध्ये कमीत कमी त्रास होईल, अशी सूचनावजा मागणी केली. तर महापालिकेने पहाटेच्या पाणीपुरवठय़ाच्या वेळांमध्ये बदल करावेत, अशी सूचना शिवसेनेचे सदस्य रमाकांत रहाटे यांनी केली. सर्व सदस्यांनी केलेल्या सूचनांवर पालिकेने विचार करावा, असे सांगून स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी पालिकेने घेतलेल्या निर्णयावर समितीची मोहर उमटवली.
पाणीकपातीच्या काळात तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष शहर : 0२२-२३६७८१0९
पश्‍चिम उपनगर : 0२२- २६१८४१७३
पूर्व उपनगर : 0२२- २५१५३२५८

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages