मुंबई - पावसाच्या जोरदार माऱ्याने मुंबईतील रस्त्यांची पुन्हा एकदा चाळण केली आहे. या खड्ड्यांचा फटका महापौर आणि महापालिका आयुक्तांनाही बसला आहे. मुख्यालयासमोरचा रस्ता अक्षरश: खड्ड्यात गेला असला, तरी मुंबईत अवघे 134 खड्डे शिल्लक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
शहरात पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्यामुळे नागरिकांसह रस्तेही बेहाल झाले आहेत. ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले असले, तरी आतापर्यंत 1353 खड्डे बुजवल्याचा दावा महापालिकेने केला आहे. सध्या अवघे 134 खड्डे शिल्लक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले, तरी खुद्द मुख्यालयासमोरच्या रस्त्याने या दाव्यातील फोलपणा चव्हाट्यावर मांडला आहे. या खड्ड्यांचा दणका महापौर सुनील प्रभू आणि आयुक्त सीताराम कुंटे यांच्याही वाहनांना बसला आहे.
महापालिकेने यंदा विभाग कार्यालयांमार्फत खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, विभाग कार्यालयांमार्फत या कामावर योग्यप्रकारे देखरेख ठेवली जात नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडल्याचे सांगण्यात आले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर आणि स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे यांच्या अंधेरी पश्चिम प्रभागात सर्वांत जास्त खड्ड्यांची नोंद आहे. या परिसरातील रस्त्यांवर तब्बल 123 खड्डे आहेत. त्या खालोखाल अंधेरी पूर्वेला 108, कुर्ल्यात 103, बोरिवलीमध्ये 103 आणि मुलुंडमध्ये 102 खड्डे नोंदवण्यात आले आहेत.
