मेट्रोचा विक्रम = 23 दिवसांत 75 लाख प्रवासी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 July 2014

मेट्रोचा विक्रम = 23 दिवसांत 75 लाख प्रवासी

मुंबई - मेट्रोला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मेट्रोतून 23 दिवसांत 75 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. यात नोकरदारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. 
"महिना पूर्ण होण्याआधीच 75 लाखांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. हा जागतिक विक्रमच आहे‘, असा दावा "मुंबई मेट्रोवन प्रायव्हेट लिमिटेड‘ (एमएमओपीएल) कंपनीचे प्रवक्ते अमित बिस्वास यांनी केला आहे. मात्र या दाव्याला पुष्टी जोडणारा कुठलाही पुरावा त्यांनी सादर केला नाही. 
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरील "मुंबई मेट्रो‘चे 8 जूनला उद्‌घाटन झाले. त्याच दिवशी 2 लाख 40 हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. दुसऱ्या दिवशी ही संख्या 2 लाख 92 हजारांवर गेली. तिसऱ्या दिवशी प्रवासीसंख्या 2 लाख 97 हजारांवर पोहोचली. नंतर काही वेळा एका दिवसात प्रवासी संख्या पाच लाखांपर्यंतही गेली. 23 दिवसांचा एकत्रित आकडा 75 लाखांपर्यंत गेला. जगभरातील मेट्रोसेवांचा आढावा घेतल्यावर महिना पूर्ण होण्याअगोदरच एवढे प्रवासी कुठल्याही मेट्रो सेवेला लाभलेले नाहीत. त्यामुळे मुंबई मेट्रोने जागतिक विक्रम केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. 

पहिल्या तीन आठवड्यांत शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत कंपनीने मुलांसाठी विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. या सेवेचा लाभ साडेचार लाख मुलांनी घेतला. 70 लाख 50 हजार प्रवाशांनी तिकीट घेऊन प्रवास केला. यातील काही हजार प्रवासी हे "स्मार्ट कार्ड‘चा वापर करतात. "स्मार्ट कार्ड‘ किमान शंभर ते कमाल तीन हजारापर्यंत "रिफील‘ करता येते. त्याअनुषंगाने त्यातून जवळपास 50 लाख रुपयांचा महसूल मिळाल्याचा अंदाज आहे. त्याशिवाय किमान 70 लाख प्रवाशांकडून प्रती "टोकन‘ दहा रुपये याप्रमाणे सुमारे सात कोटींचा महसूल मेट्रो प्रशासनाला मिळाला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, याविषयी प्रवक्ते अमित बिस्वास यांना विचारले असता, कोणतीही अधिकृत आकडेवारी देण्याबाबत त्यांनी असमर्थता व्यक्त केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages