50 हजारांची लाच घेणाऱ्या म्हाडाच्या दोघांना अटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

50 हजारांची लाच घेणाऱ्या म्हाडाच्या दोघांना अटक

Share This
मुंबई - मुलुंड पूर्व येथील म्हाडाच्या घराचे ताबापत्र आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेतल्याने म्हाडाचा मिळकत व्यवस्थापक रामकृष्ण आत्राम आणि त्याचा साथीदार वरिष्ठ लिपिक कुरूमय्या पुजारी या दोघांना लाचलुचपत विरोधी पथकाने (एसीबी) मंगळवारी (ता.1) अटक केली. 
विक्रोळी कन्नमवारनगर येथे म्हाडाने 2005 मध्ये संक्रमण शिबिरातील घरांचे वितरण केले. यानंतर काही महिन्यांतच ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली. या घरांच्या बदल्यात म्हाडाने 2013 मध्ये मुलुंड पूर्वेला बांधलेल्या इमारतींत घरे दिली. या इमारतीत राहणाऱ्या एका गाळेधारकाला त्याच्या सदनिकेचा स्थलांतरित आदेश, ताबा पावती; तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे मिळाली नव्हती. ही कागदपत्रे मिळण्यासाठी या रहिवाशाने म्हाडाच्या काळाचौकी येथील कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी तेथील वरिष्ठ लिपिक कुरूमय्या पुजारी यांनी त्याला म्हाडाच्या मुख्यालयात अर्ज करण्यास सांगितले. त्यानुसार 10 जून रोजी या रहिवाशाने अर्ज केला. यानंतर 18 जूनला पुन्हा एकदा वरिष्ठ लिपिक पुजारी यांची पुन्हा भेट घेतली; तेव्हा त्यांनी कागदपत्रे मिळण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणी गाळेधारकाने एसीबीकडे तक्रार केली होती. 

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात मिळकत व्यवस्थापक असलेल्या आत्राम यांनी सोमवारी सकाळी कुरूमय्या यांच्या सांगण्यावरून घराची कागदपत्रे देण्यासाठी या गाळाधारकाकडून 50 हजार रुपयांची लाच घेतली. त्यावेळी आधीच सापळा रचलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली. कुरूमय्या याच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे स्पष्ट होताच त्यालाही अटक करण्यात आली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages