रस्त्यावर थुंकण्यास, तंबाखू खाण्यास बंदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 July 2014

रस्त्यावर थुंकण्यास, तंबाखू खाण्यास बंदी

मुंबई - रस्त्यावर थुंकणे आणि तंबाखू खाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. राज्यभरात 1 ऑगस्टपासून ही बंदी लागू होईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी आज दिली. 
"सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी आहे. त्याप्रमाणे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाणे आणि रस्त्यावर थुंकण्यास बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. यासंदर्भातील अध्यादेश लवकरच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून काढण्यात येणार आहे. संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. रस्त्यावर थुंकण्याने हवेत क्षय आणि "एच-1 एन-1‘चे विषाणू पसरतात. यामुळे ही बंदी घालण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी अशी मोहीम राबवली होती; परंतु ती अयशस्वी ठरली. त्यामुळे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील,‘ असे सौनिक यांनी सांगितले. 

तंबाखूवरील कर वाढवणार? राज्यात आरोग्यावर सर्वाधिक खर्च हा तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या आजारांवर होतो. आरोग्य विभाग, सलाम बॉम्बे फाउंडेशन आणि हेलिस सक्‍सेरिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ यांनी मिळून एक कार्यशाळा आयोजित केली होती. त्यात तंबाखूजन्य पदार्थांवरील कर वाढविल्यास सेवनाचे प्रमाण कमी होईल, असा मुद्दा मांडण्यात आला. यासंदर्भात विक्रीकर विभागाचे सहायक आयुक्त विवेक बिमनवार, हेलिस सक्‍सेरिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ संस्थेचे संचालक प्रकाश गुप्ता, टाटा कर्करोग रुग्णालयाच्या डोके आणि मान विभागातील प्राध्यापक डॉ. प्रकाश चतुर्वेदी आदींनी सादरीकरण केले. 

उत्पन्नापेक्षा आजारावर खर्च अधिक 
सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या अहवालाचे सौनिक यांच्या हस्ते प्रकाशन या वेळी करण्यात आले. या अहवालानुसार तंबाखूजन्य पदार्थांमुळे मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा त्यामुळे होणाऱ्या आजारांवर खर्च अधिक होतो. त्यापैकी सर्वाधिक खर्च हा तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या हृदयविकारांवर होतो. तो 3 हजार 600 कोटी, तर तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगावर तुलनेने म्हणजे 1 हजार 400 कोटी खर्च होतो. तंबाखूमुळे होणाऱ्या क्षयरोगावर 2 हजार 300 कोटी, तर इतर श्‍वसनाच्या आजारांवर 2 हजार 800 कोटी खर्च होत आहे, असे अहवालात म्हटले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS