महायुतीतील घटक पक्षांना आधी उमेदवार जाहीर करावे लागणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 July 2014

महायुतीतील घटक पक्षांना आधी उमेदवार जाहीर करावे लागणार

मुंबई : महायुतीत जे नवीन घटक पक्ष सहभागी झाले आहेत त्यांना आता जागा मागण्याआधी त्यांच्याकडे त्या जागांवर सक्षम उमेदवार कोण आहेत हे स्पष्ट करावे लागणार आहे. त्यामुळे जागावाटपाआधी महायुतीतील रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम या संघटनांना आता त्यांच्याकडे सक्षम उमेदवार कोण आहेत याची यादी आधी शिवसेना-भाजपाला द्यावी लागणार आहे. 
शिवसेना आणि भाजपामधला जागावाटपाचा फॉम्र्युला अद्याप ठरलेला नसतानाच महायुतीतील घटक पक्षांनी देखील जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यास आतापासूनच मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. रामदास आठवलेंच्या रिपाइंने २५, स्वाभिमानीच्या राजू शेट्टींनी ६५, तर रासपच्या महादेव जानकरांनी ३५ जागांवर दावा केला आहे. मात्र लोकसभा निवडणुकांतील अनुभव लक्षात घेता शिवसेना-भाजपाने आधी या घटक पक्षांनी तुमच्याकडे या जागांसाठी सक्षम उमेदवार कोण आहे ते नाव आधी जाहीर करा, असा पवित्रा घेतला आहे.

घटक पक्षांच्या उमेदवाराचे नाव दिल्यानंतर तो उमेदवार निवडून येण्यास खरोखरच सक्षम आणि पात्र आहे का, याची खातरजमा आधी शिवसेना-भाजपाकडून करण्यात येईल. नंतरच त्या उमेदवारासाठी मतदारसंघ सोडायचा की नाही याचा निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका शिवसेना-भाजपाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे महायुतीतील घटक पक्षांसमोर पेच निर्माण होणार आहे. कारण आधी जागा निश्‍चित करायच्या नंतर उमेदवार ठरवता येतील, अशी रणनीती अनेकांनी आखली होती. शिवसेना-भाजपाच्या या पवित्र्यामुळे मात्र आता आधी उमेदवार ठरवा नंतर जागा मागा, अशी वेळ या घटक पक्षांसमोर आली आहे. शिवसेना-भाजपामध्ये जागावाटपाच्या चर्चेआधीच स्वबळाची भाषा सुरू झाली आहे. यामुळे इतर घटक पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात या भूमिकेमुळे आणखीनच भर पडणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS