शिवसेना आणि भाजपाच्या गुजराती प्रेमाला पालिकेचा ब्रेक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 July 2014

शिवसेना आणि भाजपाच्या गुजराती प्रेमाला पालिकेचा ब्रेक

मुंबई - वर्षभरापूर्वी पश्‍चिम उपनगरातील चौकाचे "उत्तर गुजरात चौक‘ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला होता. आता शिवसेनेचे राजू पेडणेकर यांनी ओशिवरा येथील चौकाचे "गुजरात समाज चौक‘ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. महानगरपालिका प्रशासनाने हा प्रस्ताव नियमांत बसत नसल्याचे सांगून फेटाळला असल्याने सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाच्या गुजराती प्रेमाला पालिका प्रशासनाने ब्रेक लावला आहे. 

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्‍वरी येथील आदर्शनगरात "गुजरात समाज भवन‘ आहे. तेथील चौकाला गुजरात भवन चौक असे नाव द्यावे, असा प्रस्ताव शिवसेनेचे नगरसेवक राजू पेडणेकर यांनी मांडला होता. हा प्रस्ताव बुधवारी स्थापत्य समितीसमोर मंजुरीसाठी येणार होता; मात्र एखाद्या चौकाला संस्थेचे नाव देणे महानगर पालिकेच्या नियमांत बसत नाही, असा शेरा मारून हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीत गुजराती समाजाने शिवसेना भाजपाच्या उमेदवारांना भरभरून मते दिली होती. विधानसभा निवडणूक जवळ आल्याने गुजराती समाजाला नाराज करू नये म्हणून बृहन्मुंबई गुजराती समाजाचे अध्यक्ष हेमराज शहा यांनी दिलेल्या पत्राच्या आधारे पेडणेकर यांनी हा प्रस्ताव मांडला होता. यापूर्वीही या नावाचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने फेटाळला होता. हा प्रस्ताव प्रशासनाच्या फेरविचारासाठी पाठवण्यात आला आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS