एम. व्ही. प्रियंका जहाजातून तेल गळतीचा धोका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एम. व्ही. प्रियंका जहाजातून तेल गळतीचा धोका

Share This

मुंबई : एम. व्ही. प्रियंका हे कच्चे लोखंड घेऊन जाणारे जहाज भरकटल्यामुळे थेरोंडा समुद्रकिनार्‍याला लागले आहे. जहाजातील ११ जणांना सुखरूप वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आले असले तरी जहाजात पाणी शिरल्याने तेल गळतीचा धोका मात्र कायम आहे. मेरिटाईम बोर्डाने संबंधित कंपनीला नोटीस बजावली असून तेल गळती रोखण्यासाठी विशेष पथकाला पाचारण करण्यात आले आहे. मुंबई बंदरातून रेवदांडा बंदरात निघालेले एम. व्ही. प्रियंका हे मालवाहू जहाज (बार्ज) सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास रेवदांडा बंदरातील वेल्सपन मॅक्स स्टील कंपनीच्या जेट्टीवर दाखल होणे अपेक्षित होते. मात्र वादळी वारे आणि मोठय़ा उधाणामुळे हे जहाज भरकटले. दुपारी भरकटलेले हे जहाज दुपारी तीनच्या सुमारास रेवदांडाजवळील थेरोंडा समुद्रकिनार्‍यावर आले. उधाण असल्यामुळे हे जहाज याच ठिकाणी नांगर टाकून ठेवण्याचा प्रयत्न खलाशांनी केला. मात्र नांगर तुटल्याने जहाज कलंडले. सेफ अँण्ड शुअर कंपनीच्या या जहाजात १९00 टन कच्चे लोखंड आणि मोठय़ा प्रमाणात तेल आहे. जहाज अर्धवट बुडालेल्या स्थितीत असल्याने तेल गळतीचा धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन तेल गळती रोखणार्‍या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

मंगळवारी संध्याकाळी बचाव पथकासह एक जहाज दाखल होणार असल्याची माहिती रायगडचे निवासी जिल्हाधिकारी सतीश बागल यांनी दिली आहे. दरम्यान, मेरिटाईम बोर्डाने एम. व्ही. प्रियंका जहाजाची मालकी असणार्‍या सेफ अँण्ड शुअर कंपनीला नोटीस बजावली आहे. तेल गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, जहाज तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे, बंदरात येणारे जहाज आणि जलप्रवाह तातडीने मोकळे करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या हालचालीही सुरू करण्यात आल्या असल्याचे बागल यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages