मुंबई / अजेयकुमार जाधव
सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांनी अन्यायकारक वागणूक देवून अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यापासून वंचित ठेवल्याने व नोकरी देण्यास दिरंगाई केल्याच्या निषेध म्हणून १५ जुलै रोजी सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा रंजना जनार्दन मून या अपंग महिलेने दिला आहे.
रंजना मून या ४५ टक्के अपंग आणि बौध्द धर्मीय आहेत. आपल्या आईच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी म्हणून २००५ पासून अपंग कल्याण आयुक्त पुणे,सामाजिक न्याय विभागाचे मंत्री व सचिव यांच्याकडे सतत पाठपुरावा करत आहेत. गेले ९ वर्षे सातत्याने पाठपुरावा करूनही मून यांना नोकरी मिळालेली नाही. सामाजिक न्याय विभागाचा एक शासन निर्णय असून एक शाळा ऐवजी जिल्हा युनिट म्हणून जाहीर केल्यास मून यांच्यासारख्या महाराष्ट्रातील हजारो अपंगाना अनुकंपा नोकरी मिळू शकणार आहे. परंतू एक युनिटची व्याख्या बदलाने गरजेचे असल्याने गेले कित्तेक वर्षे लढा दिला परंतू सरकार लक्ष देत नसल्याने २ जुलै रोजी राज्यपाल, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, गृहमंत्री, मुख्यसचिव, अनुसूचित जाती जमाती आयोग, महिला आयोग यांना पत्र लिहून आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
