पालिका सभागृहाचीही मंजुरी मिळाली
मुंबई / अजेयकुमार जाधव
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांचे नाव वरळी स्मशान भूमीला देण्यास पालिकेच्या आयुक्तांनी मंजुरी दिल्या नंतर नामांतराच्या या प्रस्तावाला पालिकेच्या आरोग्य समिती तसेच पालिका सभागृहानेही मंजुरी दिल्याने वरळी स्मशानभूमी आता "माता रमाई आंबेडकर वरळी स्मशानभूमी" या नावाने ओळखली जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर वरळी येथील स्मशान भूमी मध्ये अंतिमसंस्कार करण्यात आले होते. या स्मशानभूमी मध्ये स्थानिक बौद्ध बांधवांनी माता रमाई यांचा पुतळा तसेच स्मारक उभारले आहे. माता रमाई यांचे स्मारक वरळी येथील स्मशानभूमीमध्ये उभारले जावे अशी मागणी गेले कित्तेक वर्षे केली जात होती. तत्कालीन आरोग्य समित्तीच्या अध्यक्षा राजुल पटेल यांनी भेट देवून स्मारक उभे करावे अश्या सूचना पालिकेला दिल्या होत्या. परंतु पालिकेने त्याकडे अद्याप दुर्लक्ष केले होते.
याच दरम्यान सिद्धार्थ नगर आंबेडकरवादी युवक संघ, वरळी या संघटनेने वरळी येथील या विभागात ५० टक्के बौद्ध लोक राहतात. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांचे निधन २७ मे १९३५ रोजी झाले. त्यांचा अंत्यविधी वरळी स्मशानभूमी मध्ये करण्यात आला होता हि वस्तूस्थिती नगरसेविका मानसी दळवी यांच्या निदर्शनास आणून वरळी स्मशान भूमीला माता रमाई यांचे नाव द्यावे अशी मागणी केली होती.
स्थानिक बौद्ध जनतेची मागणीनुसार दळवी यांनी स्मशान भूमीचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पालिकेकडे पाठवला होता. स्मशानभूमीचे नाव बदलण्यास पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी मंजुरी दिली होती. आरोग्य समितीच्या बैठकी मध्ये प्रस्तावाला मंजुरी देण्याची औपचारिकता पूर्ण झाल्यावर या प्रस्तावाला पालिकेच्या सभागृहानेही मंजूर दिली आहे. यामुळे आता वरळी स्मशानभूमी आता "माता रमाई आंबेडकर वरळी स्मशानभूमी" या नावाने ओळखली जाणार आहे.
