मुंबई - राज्यातील ३५ विविध मागास जमातींचा समावेश अनुसूचित जमातीत करण्यासाठी मागासवर्गीय कृती समितीची स्थापना करण्यात आली असून आदिवासींचे आरक्षणाचे लाभ या मागास जमातींनाही तातडीने लागू करा, अशी मागणी समितीने केली आहे. शिवालय येथे झालेल्या या ३५ जमातींच्या बैठकीत ही मागणी करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष अनंत तरे यांनी सांगितले.
राज्यातील ३५ विविध मागास जमातींनी एकत्र येऊन मागासवर्गीय कृती समितीची स्थापना केली असून त्याच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अनंत तरे यांची निवड करण्यात आली आहे. अनंत तरे यावेळी म्हणाले की, महादेव कोळी, ठाकूर, धनगर, गोवारी, हळबा यांसह ३५ मागास जमाती एकत्र आल्या असून या जमातींना कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने या जमातींना आदिवासींप्रमाणे मिळणार्या लाभांपासून सतत वंचित ठेवले आहे. त्यामुळे समिती राज्यभर संघटनेचे जाळे विस्तारणार असून लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही आघाडी सरकारला पराभवाची धूळ चारल्याशिवाय मागासवर्गीय समाज स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
