‘लोटस‘ला लागलेली आग वाऱ्याच्या बदलत्या दिशेनुसार आणखी पसरत गेली. त्यामुळेच 68 मीटर उंचीवरील आग नियंत्रणात आणण्यासाठी वापरला जाणारा "व्होल्वो‘ अग्निशमन बंब मागवण्यात आला. पण एकाच ठिकाणाहून त्याचा वापर करता आला. भायखळा येथून हा 68 मीटर उंचीची शिडी असलेला अग्निशमन बंब अंधेरीपर्यंत पोचण्यासाठी बराच वेळ लागला. असे किमान चार बंब असते तर आगीवर नियंत्रण मिळवणे सोपे गेले असते, असे हे अधिकारी म्हणाले.
सध्याच्या अग्निशामक दलातील बंबांच्या शिड्या दहाव्या मजल्यापर्यंत पोचू शकतात. "लोटस‘च्या मदतकार्यात 22 व्या मजल्यापर्यंत पोचताना अग्निशामक दलाच्या जवानांची दमछाक झाली. इतक्या उंचीवर जाताना धुरांच्या लोटामुळे प्राणवायूचा साठाही कमी पडला, असेही समजते. आगीमुळे काही जवान होरपळले.
"ब्रान्टो मॉडेल‘ दुरुस्तीला हायड्रॉलिक प्रेशरवर 13 व्या मजल्यापर्यंत बचावकार्यात मदत करणारा "ब्रान्टो‘ बंब बिघडला आहे. त्याची 42 मीटरची हायड्रॉलिक लिफ्ट बिघडली आहे. तो बोटीने लंडनला नेण्यात येणार आहे. 31 जुलैला तो लंडनला रवाना होणार आहे. तो सुस्थितीत असता तर "लोटस‘ची आग आटोक्यात आणण्यात मोलाची मदत झाली असती.
केंद्रे वाढवण्याचा प्रस्ताव कागदावरच मुंबईतील लोकसंख्येची घनता पाहता आपत्कालीन स्थितीत अल्पावधीत घटनास्थळी पोचण्यासाठी किमान शंभर अग्निशामक केंद्रांची गरज आहे. दर पाच किलोमीटरवर एक केंद्र असावे, असा जागतिक निकष आहे. मात्र, मुंबईतील जागेची अडचण पाहता महापालिकेकडे वाढीव 33 केंद्रांचा प्रस्ताव पडून आहे.
