वकील पल्लवी पुरकायस्थ हिच्या हत्येप्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयाने रखवालदार सज्जद अहमद पठाण याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. 30 जून रोजी पठाणला याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यायालयात त्याच्याविरोधात 434 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी त्याला दोषी ठरविण्यात आले होते. आज अखेर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली. वडाळा येथील हिमालयन हाईट्स इमारतीत राहणाऱ्या पल्लवीचा 9 ऑगस्टला सुरक्षारक्षक असलेल्या सज्जादने चाकूने भोसकून खून केला होता. केंद्रीय कृषी खात्यात सचिव असणाऱ्या अधिकाऱ्याची मुलगी पल्लवी या इमारतीत अविक सेनगुप्ता या वकील मित्रासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप‘मध्ये राहत होती. ती एकटीच असताना मध्यरात्रीच्या सुमारास सज्जादने घरात घुसून बलात्काराच्या प्रयत्नात तिची हत्या केली होती. त्यानेच पल्लवीची हत्या केल्याचे पहिल्याच दिवशी स्पष्ट झाले. त्यानंतर गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती.
पोलिसांनी घटनास्थळावरून सज्जादचे रक्ताने माखलेले कपडे आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत केले होते. पल्लवीवर बलात्कार करण्याच्या उद्देशाने 9 ऑगस्टच्या मध्यरात्री तो तिच्या घरात शिरला. त्याआधी दोन वेळा त्यानेच तिच्या घराचा वीजपुरवठा तोडला होता, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे सज्जदला होणाऱ्या शिक्षेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सज्जदला फाशी देण्याची मागणी केली होती. अखेर आज त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.

