मुंबईकरांची अतिरिक्त पाणीकपात टळली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईकरांची अतिरिक्त पाणीकपात टळली

Share This
मॉल्स, पंचतारांकित हॉटेल, कारखाने, व्यापारी संकुलांची पाणीकपात ५0 टक्के 
मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या जलाशयांमध्ये गेल्या आठवड्यात बर्‍यापैकी पाऊस झाला असला तरी समाधानकारक पाऊस पडेपर्यंत पाणीकपात २0 टक्केच राहणार आहे, मात्र मंगळवारी दुपारपासून जलाशयांत चांगला पाऊस पडल्याने पाण्याच्या कपातीमध्ये वाढ होणार नाही, असा दिलासा पालिके ने मुंबईकरांना दिला आहे. पण तरण तलाव, बाटलीबंद पाण्याची उत्पादने आणि शीतपेये, उद्याने, विकासकांचे पाणी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे, तर मॉल्स, पंचतारांकित हॉटेल, कारखाने, व्यापारी संकुलांची पाणीकपात ५0 टक्के करण्यात येणार आहे. हे निर्णय गुरुवारपासून अमलात येणार आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी स्थायी समितीच्या सभेत दिली. 

समितीमध्ये पाणीपुरवठय़ाविषयी निवेदन करताना अडताणी यांनी सांगितले, या वर्षी जुलैमध्ये तलावांच्या क्षेत्रात समाधानकारक वाढ झालेली नाही आणि जलस्रोतांचा एकूण उपलब्ध साठा गेल्या १0 वर्षांच्या तुलनेत सध्या २५ टक्के इतका आहे. तानसा, अप्पर वैतरणा, भातसा यांची गेल्या १0 वर्षांच्या तुलनेत चालू वर्षी पाऊस पडल्याची सरासरी टक्केवारी ३६.२८ टक्के आहे. अप्पर वैतरणामधून ३१ टक्के राखीव साठा आणि मोडक सागरमधून ३४ टक्के राखीव साठा घेतल्यास २८ ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकतो. १५ जुलैच्या दुपारपासून पाऊस सुरू झाला आहे. मोडक सागरमध्ये ५२ मिमी, तानसामध्ये ६२ मिमी, अप्पर वैतरणामध्ये २८ मिमी, भातसामध्ये ६0 मिमी व मध्य वैतरणात ३१ मिमी एवढा पाऊस सकाळी सहा वाजेपर्यंत झाला आहे. बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्ये एक लाख ११ हजार १९३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा २८ दिवस पुरेल इतका असला तरी, समाधानकारक पाऊस पडेपर्यंत सध्याची कपात २0 टक्के कायम राहणार आहे, असे अडतानी म्हणाले. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या जलाशयांतील साठा लक्षात घेऊन पालिकेने तत्काळ केलेल्या उपाययोजनांची माहिती अडतानी यांनी समितीला दिली.

* ज्या तरण तलावांना महापालिकेचा पाणीपुरवठा होतो, त्यांचा पाणीपुरवठा खंडित करणार.
* मॉल्स, तारांकित हॉटेल्स, कारखाने आणि व्यापारी आस्थापना यांच्या १00 मिमी आकारापेक्षा मोठय़ा असलेल्या जलजोडण्या नियंत्रित करून त्यांचा पाणीपुरवठा ५0 टक्के कमी करणार.
* बांधकामांच्या जागेवर दिलेल्या १५ मिमीपेक्षा मोठय़ा जलजोडण्या कमी करून तेथील कामगारांना पाणी पिण्यासाठी फक्त १५ मिमी आकाराची जोडणी सुरू ठेवणार.
* उद्यानांसाठी असलेल्या जलजोडण्या खंडित करण्यात येणार असून तेथे पाण्यासाठी पर्यायी स्रोतांचा वापर करण्यात येणार.
* सार्वजनिक शौचालयांना फ्लशिंग व साफसफाईसाठी पर्यायी जलस्रोतांचा वापर करण्याच्या सूचना देणार.
* पालिकेच्या भूमिगत जलवाहिन्यांच्या १00 मीटर परिघाबाहेर कूपनलिका खोदण्यासाठी पालिका परवानगी देणार. संबंधित विभागांना तशा सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.
* सध्या अस्तित्वात असलेल्या विहिरी व कूपनलिका यांचे सर्वेक्षण झाले असून त्यातील कुठल्या विहिरी व कूपनलिकांचा उपयोग होऊ शकतो याची माहिती गोळा केली आहे. त्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त करण्यात येईल.
* महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये व इमारतींत पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत तसेच सार्वजनिक ठिकाणी व महापालिकेच्या कार्यालयांमध्ये नव्या कूपनलिका खोदण्यासाठी, स्रोत तपासण्यासाठी जीएसडीएकडून तपासणी करणार.
* पाणीकपात लागू असेपर्यंत पालिका नव्या जलजोडण्या देणार नाही.

जलाशयांमधील पाणीसाठा
मोडक सागर : ५९ हजार ५0५ दशलक्ष लिटर, तानसा : ११ हजार २0९ दशलक्ष लिटर, विहार : सहा हजार ४१४ दशलक्ष लिटर, तुळशी : चार हजार ९६४ दशलक्ष लिटर, अप्पर वैतरणा : ५९३ दशलक्ष लिटर, भातसा : २९ हजार १0१ दशलक्ष लिटर. गेल्या वर्षी १६ जुलैपर्यंत तलावांमध्ये आठ लाख ८0 हजार 00७ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक होता. हा साठा यंदाच्या तुलनेत सात लाख ६८ हजार ८१४ दशलक्ष लिटरने कमी आहे. गतवर्षी पाणीसाठा हा २२७ दिवस पुरेल इतका होता.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages