पोस्टमार्टम = भाग २ = चांगल्या सुविधा मिळत नसल्याने रुग्णांचे हाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 July 2014

पोस्टमार्टम = भाग २ = चांगल्या सुविधा मिळत नसल्याने रुग्णांचे हाल

मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेची रुग्णालये सेवाभावी काम म्हणून सुरु असून लोकांच्या सोयीसाठी चालवण्यात येतात असे बोलले जात असले तरी पालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये मात्र रुग्णांना चांगल्या सुविधाच मिळत नसल्याने रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. 
सायन टिळक रुग्णालयामध्ये ओपीडीसाठी काही वर्षापूर्वी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीमध्ये ओपीडी दातही रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. रुग्णांची गर्दी असताना केसपेपर देण्यासाठी १ ते ९ क्रमांकाच्या खिडक्या बनवण्यात आल्या असल्या तरी त्यापैकी ५ व ६ या दोनच खिडक्या सुरु असतात. यामुळे रुग्णांना केसपेपर काढणे, केसपेपर वर तारीख टाकणे, इत्यादी कामासाठी तासान तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. नवीन ओपीडी इमारतीमध्ये ओपीडी विभाग असा काही बनवण्यात आला आहे कि उन्हाळ्याच्या दिवसात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या ठिकाणी उकाड्यामुळे थांबू शकत नाहीत. या ठिकाणी खेळती हवा असावी यासाठी कोणत्याही उपाययोजना नसल्याने रुग्ण आणी सामान्य लोकांचा श्वास कोंडला जात आहे. 

ओपीडी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असल्याने कित्तेक रुग्णांना पहिल्या माळ्यावर ये जा करताना त्रास होतो. या ठिकाणी व्हीलचेअर, स्ट्रेचर नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनाच व्हिलचेअर, स्ट्रेचर शोधून आणण्यास सांगितले जाते. अब्दुल रज्जाक यांच्या पायाचे ऑपरेशन झाले असून त्यांचा पाय कापण्यात आला आहे. त्यांना चालताही येत नाही अशा परिस्थिती मध्ये फक्त मलमपट्टी करायला  त्यांना आठवड्यामधून एक दोन वेळा यावे लागते. परंतू दोन दोन तास ओपीडी इमारतीच्या खाली बसूनसुद्धा व्हीलचेअर मिळत नाही. नर्स आणि वार्डबॉय हे कधीही रुग्णांना किवा त्यांच्या नातेवाईकांना मदत करत नाहीत असे रज्जाक यांच्या नातेवाईकांनी सांगितले. 

रुग्णालय इमारतीमध्ये लहान मुलांसाठी २१ व २२ क्रमांकाचा वार्ड आहे. या वार्ड मध्ये पंख्यांची अशी व्यवस्था करण्यात आली आहे कि लहान मुलांना हवाच मिळत नसल्याने लहान मुलांना वार्डच्या बाहेर ग्यालारीमध्ये बसावे लागत आहे. हृदयाची शस्त्रक्रिया होणाऱ्या ३२ क्रमांकाच्या वार्डमध्ये एयान्जीयोप्लास्टीची शस्त्रक्रिया होणाऱ्या व शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना खाली जमिनीवर झोपवण्यात येत आहे. अशा सर्व प्रकारांमुळे सायन रुगालयात येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. रुग्णांना अश्या प्रकारची वागणूक दिली जात असल्याने व रुग्णांना चांगल्या सुविधा मिळत नसल्यामुळेच सायन रुग्णालयामध्ये गेल्या १३ वर्षामध्ये ६३ हजार ३१३ रुग्णांचा मृत्यू विविध कारणांनी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Displaying sion hospital photo.jpg

Post Bottom Ad

JPN NEWS