पालिका कॅम्पाकोलाबाबत १५ दिवसांनंतर कारवाईचे धोरण ठरवणार - अडतानी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका कॅम्पाकोलाबाबत १५ दिवसांनंतर कारवाईचे धोरण ठरवणार - अडतानी

Share This
वरळी येथील अनधिकृत कॅम्पाकोलाबाबत सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तहकूब केल्यानंतर, या कालावधीत पालिका कोणतीही कारवाई करणार नाही. '१५ दिवसांनंतर महापालिका पुढील कारवाईचे धोरण ठरवणार आहे,' अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी मंगळवारी रात्री उशिरा पत्रकारांना दिली. 
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कॅम्पाबाबत सुनावणी झाली, त्या वेळी मुंबई पालिका आणि रहिवाशांनी न्यायालयाबाहेर तोडगा काढावा, असा पर्याय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. पण पालिकेने तोडग्यास नकार दिला असून, अवैध बांधकामे पाडण्यावर प्रशासन ठाम आहे. यामुळे दोन आठवड्यांनंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. या कारवाईबाबत रहिवाशांना आणखी स्पष्टता हवी असल्यास न्यायालयात अर्ज दाखल करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ही कारवाई न्यायालयाच्या निर्देशानुसार होत असल्यामुळे रहिवाशांना आंदोलन किंवा कारवाईचा निषेध करता येणार नाही, असेदेखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पालिकेने कारवाई करताना बळाचा वापर करूनये, असे न्यायालयाने पालिकेला सुनावले आहे. 

'१५ दिवसांनंतर पुन्हा सुनावणी होणार असल्याने तोपर्यंत वाट पाहण्याचे ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी पुन्हा सुनावणी झाल्यानंतर न्यायालय काय निर्देश देते यावर पालिका पुढील कारवाईचे धोरण ठरवणार आहे. मात्र तोवर पालिका अवैध फ्लॅटमधील भिंती तोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. १५ दिवसांनंतर सर्वोच्च न्यायालय कॅम्पा प्रकरणी नेमकी काय भूमिका घेते यावर पालिकेचे संबंधित वरिष्ठ पुढील कारवाईची दिशा ठरवणार आहेत. तोवर पालिका सावधगिरीने पावले टाकत आहे असे अडतानी यांनी पत्रकारांना सांगितले.  

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages