'पेड न्यूज' प्रकरणी मोदींना घेरणार- मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 July 2014

'पेड न्यूज' प्रकरणी मोदींना घेरणार- मुख्यमंत्री

मुंबई - लोकसभा निवडणुकीत "अब की बार मोदी सरकार‘ अशा प्रकारच्या जाहिराती आणि नरेंद्र मोदी यांच्या भाषणांचे माध्यमांनी केलेले थेट प्रक्षेपण "पेड न्यूज‘चा भाग असू शकतो, असा संशय घेत, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "पेड न्यूज‘ प्रकरणात घेरण्याची तयारी कॉंग्रेसने सुरू केल्याचे संकेत दिले. मंत्रालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्रिपदावर कायम राहिल्यानंतर आत्मविश्‍वासाने आज पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. आगामी विधानसभा निवडणूक चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्णय कॉंग्रेस श्रेष्ठींनी जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडणुकीला सामोरे जाताना कोणत्या प्रकारची रणनीती कॉंग्रेस आखणार यावर चव्हणा यांनी सविस्तर भाष्य केले.

ते म्हणाले, की लोकसभा निवडणूक व्यक्तिकेंद्रित होती. नरेंद्र मोदी यांनी स्वत:साठी मते मागितली होती. जनतेने त्यांना कौल दिला; पण संपूर्ण प्रचारयंत्रणेत एखाद्या कंपनीने साबण अथवा टूथपेस्ट विकण्यासाठी ज्या प्रकारचे मार्केटिंग तंत्र अमलात आणावे, तशाप्रकारे नरेंद्र मोदींचा ब्रॅंड म्हणून वापर करण्यात आला. हे मार्केटिंग करताना प्रसारमाध्यमांनी दोन- दोन तास मोदी यांच्या सभांचे थेट प्रक्षेपण केले. हा प्रकार "पेड न्यूज‘मध्ये येतो की नाही, याबाबत निवडणूक आयोगाने विचार करायला हवा.

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी प्रचंड प्रमाणात पैसा वापरल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आणि या पैशांचा आकडा ऐकला तर डोळे फिरतील, असा दावाही केला. त्यामुळे निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरेला पैसा कोठून आला, याची चौकशी व्हायला हवी. परदेशातून आला असेल, तर तो कोणत्या मार्गाने आला, अथवा देशातूनच पैसा मिळाला असेल, तर तो कोणी दिला आणि त्याबदल्यात पैसा देणाऱ्यांना काय देण्याची हमी दिली होती. या सर्व बाबींची निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घ्यायला हवी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. कॉंग्रेसने या विषयीचा अभ्यास सुरू केलेला असून, योग्य वेळी योग्य तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे ते म्हणाले.

लोकसभेत आम्ही कमी पडलो... 
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रचारतंत्राचा प्रभावी वापर केला. कॉंग्रेसला याबाबत अंदाज आला नाही. त्यातही "यूपीए‘ सरकारबद्दल लोकांमध्ये नाराजी होती. लोकांनी ती व्यक्‍त केली, अशी कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत या प्रचारतंत्राचा प्रभावी वापर करण्याचा कॉंग्रेसचाही प्रयत्न राहील. मात्र लोकांच्या मनातली जागा महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत जागावाटपाचा पेच असला, तरी प्रत्येक निवडणुकीत दोन्ही पक्ष समाधानकारक तोडगा काढतात. या वेळीही त्यावर तोडगा काढला जाईल, अशी सावध भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी बोलताना घेतली. प्रत्येक निवडणुकीत जागावाटपात फेरबदल होत असतात. मात्र अधिकात अधिक जागा जिंकून याव्यात या दिशेने आघाडीचे प्रयत्न असतील. मात्र दोन्ही पक्षांचे नेते समोरासमोर बसूनच जागावाटपाची चर्चा करतील, असे ते म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS