हॉटेल, क्लब, बड्या कंपन्यांमध्येही पाणीकपात होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

हॉटेल, क्लब, बड्या कंपन्यांमध्येही पाणीकपात होणार

Share This
मुंबईतील पंचतारांकित हॉटेल, क्लब, जलतरण तलाव, गॅरेज आणि बड्या कंपन्यांचीही पाणीकपात करण्यात येणार आहे. तसेच वैतरणात ३७ दिवस आणि भातसामध्ये ८ दिवस वापरण्याजोगा आणि वैतरणा व भातसामध्ये ७३ व ९६ दिवस राखीव पाणीसाठा आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी गुरुवारी स्थायी समितीमध्ये दिली. मात्र मुंबईत सध्या सुरू असलेली २0 टक्के पाणीकपात आणखी वाढवण्यासंबंधी आयुक्तांनी काही उल्लेख केला नाही. आयुक्तांनी या संदर्भात दिलेली माहिती मोघम असून ते सभागृहाची दिशाभूल करत आहेत, असा आरोप करून सत्तारूढ शिवसेना आणि भाजपावगळता विरोधी पक्षांनी सभात्याग केला. 
मुंबईत सध्या पाणीपुरवठय़ाची परिस्थिती गंभीर असून आठवड्यातून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची चर्चा जल अभियंता विभागातील अधिकारी करत आहेत. असे असताना पालिका प्रशासनाने स्थायी समितीमध्ये निवेदन करणे आणि श्‍वेतपत्रिका मांडणे आवश्यक होते, अशी मागणी काँग्रेसचे सदस्य प्रवीण छेडा यांनी केली. पंतनगर विभागात गेले तीन दिवस पाणी मिळत नसून तेथे पाण्याचे टँकर्सही येत नसल्यामुळे रहिवाशांचे हाल होत आहेत, याकडे त्यांनी समितीचे लक्ष वेधले. 

मनसेचे सदस्य दिलीप लांडे यांनीही त्यांना पाठिंबा देताना सांगितले, २00९ मध्ये हीच परिस्थिती निर्माण झाली होती. आताही डोंगराळ भागात पाणी मिळत नसून तेथे चार दिवसांनी पाणी येत आहे. यावर पालिका प्रशासनाने काय उपाय केले आहेत, अशी विचारणा केली. झोपड्यांमध्ये असलेल्या विहिरी पालिकेने ताब्यात घेतल्यास त्याचा वापर पिण्याच्या व्यतिरिक्त अन्य दैनंदिन वापरासाठी करता येईल. झोपड्यांमध्ये राहणारे रहिवासी रोज २00 ते ४00 लिटर्स पाण्याचा साठा करतात. मात्र यावर पालिका प्रशासनाने कायमस्वरूपी व्यवस्था केली पाहिजे, अशीही सूचना त्यांनी केली. भाजपाचे अमित साटम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता धनंजय पिसाळ, काँग्रेसच्या शीतल म्हात्रे, राखी जाधव आणि भोमसिंग राठोड, भाजपाचे गटनेते मनोज कोटक, विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनीही चर्चेत भाग घेतला. 

शहरात पाणीगळतीचे १५ हजार 'स्पॉट' असून यामुळे २५ टक्के पाणी वाया जात आहे. ही गळती रोखण्यासाठी पालिकेने काय कारवाई केली आहे, अशी विचारणा अमित साटम यांनी केली. तर पिण्यासाठी पाणी नसताना गाड्या धुतल्या जात आहेत. पाण्याची हीच परिस्थिती राहिल्यास मुंबईतील घर सोडून गावाला जावे लागेल, असा टोला पिसाळ यांनी लगावला. कृत्रिम पाऊस पाडण्याऐवजी पाणीपुरवठय़ाच्या कायमस्वरूपी उपाययोजना करा, अशी सूचना म्हात्रे यांनी केली. मुंबईतील व्यावसायिक संस्था, पंचतारांकित हॉटेल्स, धनाढय़ांचे क्लब व तरण तलाव, पाण्याचा जादा वापर करणार्‍या बड्या कंपन्या यांचीही पाणीकपात का केली नाही, अशी विचारणा कोटक यांनी करून त्यांना पालिका प्रशासनाने आजच नोटीस पाठवावी, अशी मागणीही केली. पाणीकपातीमुळे मुंबईकर त्रस्त झाले असून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या योजनेचे काय झाले, अशी विचारणा आंबेरकर यांनी केली. 

सदस्यांच्या चर्चेला उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त अडतानी यांनी सांगितले, सर्व तलावांच्या क्षेत्रात ९ जुलैपर्यंत ७९६ मिमी पाऊस पडणे आवश्यक होते; पण सध्या फक्त २0७ मिमी पाऊस पडला आहे. केवळ ३0 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. तलावांच्या क्षेत्रात पाऊस पडला नसला तरी पालिका दररोज पाणीसाठय़ाचा आढावा घेत आहे. पाणीकपात वाढवावी लागल्यास बोअरवेल आणि विंधण विहिरींचा पर्यायी वापर करण्यात येणार आहे. मुंबईत १५ हजार ६३३ बोअरवेल, विंधण विहिरी असून सार्वजनिक विहिरींचेही पाणी वापरता येईल; पण खाजगी विहिरींतील पाणी वापरासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून अनुमती घ्यावी लागणार आहे. शिवाय पाणी वापराबाबत पालिका लवकरच जनजागृती मोहीम राबवणार आहे आणि कृत्रिम पाऊस पाडण्याच्या निविदा १४ किंवा १५ जुलै रोजी उघडण्यात येणार आहेत. 

सोसायट्यांनाही बोअरवेल खोदण्याची अनुमती देण्यात येणार असून त्यांना बोअरवेल खोदताना भूमिगत जलवाहिन्यांपासून १00 मीटर्स दूर अंतरावर बोअरवेल खोदता येतील. मात्र बोअरवेल खोदण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाशी गुरुवारी बोलणी झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages