मुंबईमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये मागील आठवड्या पर्यंत पाऊस पडत नसल्याने मुंबईमध्ये २० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. पाऊस पडत नसल्याने पाणीकपात आणखी १० टक्के वाढवावी म्हणून पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे यामुळे आधीच कित्तेक ठिकाणी कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असताना पाण्याची समस्या गंभीर होणार होती. पालिका मुंबई मध्ये येताना गळती होणारे ७०० एमएलडी पाणी, चोरी होणारे १६० एमएलडी पाणी वाचवण्यात पालिकेला अपयश आले आहे. हे पाणी पालिका प्रशासनाने वाचवले असते मुंबईकर नागरिकांवर पाणीकपात करण्याची गरज लागली नसती. परंतु पाणीचोरीमधून पाणी माफियांना वर्षाला १४६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. पाणीचोरी मधून मिळणाऱ्या उत्पन्ना मधील टक्केवारी पालिका अधिकाऱ्यांना मिळत असल्याने पाणीचोरीकडे आणि पाणीचोरी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले गेले आहे. असा मुद्दा मागील आठवड्यामध्ये "मुंबईवर पाणी संकट" लेख लिहून मांडला होता.
यानंतर मुंबईला जो पाणीपुरवठा केल जातो त्यामध्ये लिटरमागे ११ रुपये खर्चून सर्वसामान्य मुंबईकरांना ३.२५ पैसे दराने पाणी उपलब्ध करून दिले जाते. अनेक ठिकाणी पाणीमाफिया स्वत:चे उखळ पांढरे करून घेत पाण्याचा काळाबाजार करत असल्याच्या तक्रारी मुंबई महानगर पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत विविध पोलिस ठाण्यात पाणीमाफियांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र पुरावे आणि साक्षीदार समोर येत नसल्याने पाणीमाफिया जामिनीवर सुटत आहेत. पाणी बचतीसाठी जनजागृती होऊनही पाण्याची नासाडी सुरूच आहे. पालिकेने पाणी माफीयांविरोधात धडक मोहीम राबवण्याचे ठरवले असून पाणीमाफियांची पाणीचोरी उघड झाल्यास संबंधित पोलिस ठाण्यात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पाणीचोरी होत असलेल्या भागात पोलिस गस्त घालण्यात येणार असून पाणी माफियांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या जल विभागातील उपजल अभियंता अशोक तवाडिया यांनी पत्रकारांना सांगितले आहे.
एकीकडे मुंबईकरांच्या नळाला कमी पाणी येत असताना दुसरीकडे शीतपेय व मिनरल वॉटर तयार करणा-या कंपन्या व इतर कंपन्यांना पिण्याच्या पाण्याशिवाय पालिकेतर्फे मोठय़ा प्रमाणात पाणीपुरवठा केला जात असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी व्यावसायिक वापरासाठी दिले जाणारे पाणी त्वरित बंद करावे, अशी मागणी केली आहे. मुंबई पालिका ही व्यावसायिक संस्था नसून ती सेवाभावी संस्था असल्याचे सत्ताधारी पक्षातील भाजपचे म्हणणे आहे. त्यामुळे सत्ताधा-यांनी व्यावसायिक वापरासाठी देण्यात येणारे पाणी बंद करण्यासाठी विरोधकांच्या मागणीला पाठिंबा दिला पाहिजे. जर पालिकेने हे पाणी बंद केले नाही तर हे विरोधी पक्षातील नेते या सर्वाच्या जलवाहिन्या तोडतील. त्यांचे पाणी बंद करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. मुंबई महानगर पालिकेमध्ये पाण्यावरून वातावरण तापले असताना प्रशासन मात्र तितके गंभीर नसल्याचे दिसत आहे.
मुंबईमधील विहिरी पालिकेने ताब्यात घ्याव्यात व त्या साफ करून मुंबईकर नागरिकांना पाणीपुरवठा करावा अशी मागणी या आधीही कित्तेक वेळा करण्यात आली. परंतू पालिकेने गेल्या कित्तेक वर्षामध्ये विहिरी ताब्यात घेतल्याचे ऐकिवात नाही. आजही मुंबईमध्ये तीन हजार सार्वजनिक आणि खाजगी विहिरी आहेत. त्या जिवंत आहेत. या विहिरी राज्याची, देशाची संपत्ती आहे. या विहिरी त्वरित पालिकेने ताब्यात घेण्यची गरज आहे. पालिकेने पाऊस पडत नसल्याने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी १५ जुलै पासून टेंडर मागवणार आहे. कृत्रिम पाऊस एका वर्षात पडणे शक्य नाही. हि प्रक्रिया सातत्याने दोन तीन वर्षे करावी लागते तेव्हा कुठे कृत्रिम पाऊस पडता येतो. याची पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोंद घेण्याची गरज आहे. एखाद्या वर्षी कृत्रिम पावसाचा प्रयोग करून पाऊस पडणार नसल्याने या प्रयोगावर केला जाणारा मुंबईकर नागरिकांचा पैसा फुकट जाण्याची शक्यता आहे.
सध्या मुंबईमध्ये जो पाऊस पडतो याचे पाणी दरवर्षी मुंबईमध्ये तुंबून नंतर गटारामार्गे समुद्रामध्ये जाऊन मिळते. मुंबईला धरणामधून जसे पाईपद्वारे पाणी पुरवले जाते तसेच मुंबई मध्ये पडणारे पाऊसाचे पाणी पुन्हा धरणापर्यंत नेण्याची योजना आखण्याची गरज आहे. यामुळे पाऊसाचे वाया जाणारे पाणी पुन्हा धरणामध्ये नेल्यास या पाण्याचा वापर पुन्हा केला जाऊ शकतो. मुंबईमध्ये आणि पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सध्या पाऊस पडत आहे. यामुळे मुंबईवर असलेले पाणी संकट टलेले असे गृहीत धरून प्रशासनाने गप्प बसू नये. पुढे येणाऱ्या काळात अशी स्तिथी पुन्हा उदभवणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे.
मुंबईमध्ये नागरिकांवर एकीकडे पाण्याचे संकट असताना शहरात मागील काही दिवसांत पावसाच्या दमदार सरी कोसळू लागल्या असून साथीच्या विविध आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. जुलैच्या पहिल्याच आठवडय़ात तापाचे १,२७८, गॅस्ट्रोचे ३५४ आणि मलेरियाचे १०३ रुग्ण शहरभरात आढळल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे. लहानांपासून ते अगदी मोठय़ांपर्यंत सर्वच जण तापाने फणफणले असून अनेकांनी खासगी व सरकारी रुग्णालयांकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे. पावसाच्या हजेरीने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने अचानक बदल झाला आहे. या बदलेल्या हवामानामुळे पालिकेच्या साथरोग नियंत्रण विभागाची त्रेधा उडाली असून अवघ्या आठवडय़ाभरातच तापाचे १,२७८ रुग्ण आढळले आहेत.
मलेरियाचे १०३ रुग्ण आढळले असून पाणीपुरवठा करणा-या अनेक जलवाहिन्यांना ठिकठिकाणी पडलेली छिद्रे आणि दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसारखे आजारही बळावले आहेत. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात गॅस्ट्रोचे ३५४ रुग्ण आढळले असून मागील वर्षी जूनमध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णांचा आकडा २,६०४ असा होता. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकरांनी पाणी उकळून प्यावे तसेच उघडय़ावरील व अर्धवट शिजलेले खाद्यपदार्थ खाऊ नयेत, असा सल्ला डॉक्टर देत आहेत. एकीकडे डेंग्यूसारखे आजार रोखण्यासाठी महापालिकेची धडपड सुरू असताना डास प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्याने महापालिकेने २,२८४ निवासी संकुले, कॉर्पोरेट कार्यालये, बांधकाम सुरू असलेल्या इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत.
मे महिन्यात १,४४० जणांना महापालिकेने नोटिसा पाठवल्या होत्या. अंधेरी पूर्व (के’ पूर्व) प्रभागात २३४ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. राज्याचा विचार केला असता जानेवारी ते जून या काळात १३,७८६ डेंग्यूच्या संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. ११०० जणांना डेंग्यूची लागण झाली असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतही जूनमध्ये २७ तर जुलैमध्ये डेंग्यूच्या ७ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई मध्ये पावसाळा सुरु झाला असून अनेक रोग पसरण्यास सुरवात झाली आहे. पालिकेच्या रुग्णालयामध्ये कश्या प्रकारे सुविधा मिळत आहेत याचे उदाहरण म्हणून मुंबई महानगर पालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालया मधील सावळा गोंधळा बाबत दैनिक जनतेचा महानायक मध्ये वृत्त मालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. या वृत्तमालिकेची दखल खुद्द मुख्यमंत्री कार्यालयाने घेवून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला उचित कारवाही करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईकर नागरिकांवर एकीकडे पाण्याचे संकट आणि दुसरीकडे रोगराईचे संकट आले आहे. येणाऱ्या काळात या दोन्ही संकटामधून मुंबईकर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे मोठे आव्हान मुंबई महानगरपालिकेला पेलावे लागणार आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३


No comments:
Post a Comment