धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याची गरज - आझमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 July 2014

धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याची गरज - आझमी

मुंबई - जातीयवादी पक्षांविरोधात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व इतर धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्रितपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला तर ठीक आहे; अन्यथा समाजवादी पक्ष स्वबळावर राज्यात 40 जागा लढवील, अशी माहिती समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसीम आझमी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 
आघाडी होत असेल, तर आमच्या सध्या असलेल्या जागांपेक्षा जास्त जागा मागू, असेही आझमी म्हणाले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी व धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी करणे ही आमची कमजोरी नसून सध्याच्या वातावरणाची ती गरज आहे, असे ते म्हणाले.
देशातील सर्वसामान्य नागरिकांना खोटी स्वप्ने दाखवून नरेंद्र मोदी सत्तेवर आले आहेत. हे सरकार गोरगरिबांची थट्टा करत आहे, अशी टीका त्यांनी केली. ग्रामीण भागात 33 रुपये व शहरात 47 रुपयांत दिवसभराचा खर्च चालवता येतो, असे अकलेचे तारे भाजप नेत्यांनी तोडले आहेत, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी कॉंग्रेस नेते राज बब्बर यांनी असेच वक्तव्य केले होते. त्या वेळी भाजपने विरोध केला होता; मात्र आता त्यांचेच नेते अशी वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अमित शाह यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याने ते देशाला जोडण्याऐवजी तोडण्याचे काम करतील, अशी टीकाही आझमींनी केली. मनसेने नेहमीच मराठी व हिंदी भाषकांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज व उद्धव ठाकरे कमजोर झाले आहेत. त्यांच्या रिमोट कंट्रोलची बॅटरी डिस्चार्ज झाली आहे, असे ते म्हणाले. 

Post Bottom Ad

JPN NEWS