सुगंधी तंबाखू व्यापाऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 July 2014

सुगंधी तंबाखू व्यापाऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन

मुंबई- सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी व अन्य तंबाखूजन्य वस्तूंच्या उत्पादन व विक्रीवर राज्य सरकारने घातलेली बंदी उठविण्याच्या मागणीसाठी व्यापारी महासंघाने गुरुवारी आझाद मैदानात आंदोलन केले. सरकारने बंदी उठवली नाही, तर उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. सुगंधी तंबाखूवर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने घातलेली बंदीची मुदत 18 जुलैपर्यंत आहे. ही बंदी पुन्हा घालण्यासाठी सरकारला तरतूद करावी लागणार आहे. राज्य सरकारने ही बंदी वाढवू नये, अशी महासंघाची मागणी आहे. यासंदर्भात महासंघाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुरुवारी भेट घेतली; मात्र पवार यांनी ठोस आश्‍वासन देण्याचे टाळले. आपल्या प्रश्‍नांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने पानटपरीमालक आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारविरोधात मतदान करतील, असा इशारा मुंबई विडी तंबाखू व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदकुमार हेगिष्टे यांनी या वेळी दिला. 

सुगंधी सुपारीवर बंदी घालण्याऐवजी सरकारने त्याच्यावरील कर वाढवावा. त्यामुळे सुपारीची खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी होईल व विक्रेत्यांचा रोजगार चालू राहील, असा तोडगा संघटनेने सुचवला आहे. केवळ पानटपरी चालवणाऱ्या चालक-मालकांवरच नव्हे, तर या बंदीचा परिणाम तंबाखूच्या मळ्यात काम करणारे शेतमजूर, शेतकरी, वाहतूकदार, हमाल व विक्रेत्यांच्या रोजगारावर होत आहे, असे व्यापारी महासंघाचे म्हणणे आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS