जनसुनावणीला टाटाच्या कामगिरीला प्रशस्तीपत्र देणाऱ्यांची मोठी गर्दी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जनसुनावणीला टाटाच्या कामगिरीला प्रशस्तीपत्र देणाऱ्यांची मोठी गर्दी

Share This
मुंबई- टाटा पॉवरने वीज वितरण परवान्यासाठीच्या राज्य वीज नियामक आयोगासमोरील गुरुवारच्या जनसुनावणीला ऐतिहासिक अशी 1600 जणांची हजेरी लावली. 25 वर्षांसाठी परवाना मुदतवाढीच्या याचिकेसोबत ग्राहकांच्या हरकती आणि सूचनाही कंपनीने मागवल्या होत्या. वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये झालेल्या जनसुनावणीला टाटाच्या कामगिरीला प्रशस्तीपत्र देणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. या वेळी बेस्टने टाटाच्या मुदतवाढीला आक्षेप घेतला. 
आयोगाचे अध्यक्ष चंद्रा अय्यंगार यांनी टाटाला प्रशस्तीपत्र देणाऱ्यांच्या गर्दीचीही या वेळी कानउघाडणी केली. टाटा कंपनीला प्रशस्तीपत्र देण्यासाठी हजेरी न लावता प्रस्तावावर काही म्हणणे मांडायचे असेल तरच बोला, असे खडे बोल अध्यक्षांनी सुनावले. टाटा पॉवरने सादरीकरणात काही मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. मुंबईत वीज वितरणासाठी यंत्रणा उभारण्याच्या आक्षेपाचा मुद्दा टाटा पॉवरने आपल्या सादरीकरणात खोडून काढला. मुंबईत वीज वितरण यंत्रणा विकसित करण्यात अनेक अडथळे असल्याचे टाटा पॉवरचे प्रतिनिधी विद्याधर वागळे यांनी स्पष्ट केले; तसेच वीज ग्राहकांना वीजपुरवठा देताना "चेरी पिकिंग‘ची पद्धत अवलंबली गेली, या आरोपाचेही त्यांनी खंडन केले. आम्ही वीज वितरण क्षेत्रात स्पर्धा निर्माण करू आणि ग्राहकांना सेवा पुरवठादार निवडण्याचा अधिकार देऊ, असे आश्‍वासन टाटाकडून देण्यात आले. वीज ग्राहक संघटनांपैकी ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अशोक पेंडसे यांनी टाटाची कामगिरी अपेक्षित निकषांपेक्षा खालावलेली असल्याचे सांगितले. परवाना देताना ठराविक अटी, शर्ती घालूनच मुदतवाढ द्यावी, असे त्यांनी सुचवले. 

बेस्ट वीजपुरवठा आणि परिवहन उपक्रमामार्फत ओमप्रकाश गुप्ता यांनी केलेल्या सादरीकरणात टाटा पॉवरला परवाना नूतनीकरणाची परवानगी मिळू नये, अशी मागणी केली. टाटा पॉवर ही कंपनी परवाना मिळवण्यासाठी पात्रच नाही, असे ते म्हणाले. बेस्टने वीज वितरण परवान्याच्या नूतनीकरणासाठी सरासरी क्षेत्राचा उल्लेख केला आहे; पण बेस्टच्या वीजपुरवठा क्षेत्रात टाटाचा ग्राहक क्वचितच असेल. त्यामुळे टाटाच्या साडेचार लाख ग्राहकांपैकी बेस्टच्या क्षेत्रातील ग्राहकांची आकडेवारी आयोगाने तपासून पाहावी, असे आव्हानही गुप्ता यांनी दिले. टाटा पॉवरला परवाना दिला नाही, तर विद्यमान यंत्रणा हाती घेण्यास बेस्ट सज्ज आहे, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages