मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये अंधाधुंदी कारभार चालला असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांना होणाऱ्या त्रासाबाबत "जेपीएन न्यूज" वेबसाईट व दैनिक "जनतेचा महानायक" मध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून योग्य ती कारवाही करण्याचे निर्देश राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला दिले आहेत.
सायन येथील रुग्णालयामध्ये सुरक्षा व्यवस्था चांगली नाही, रुग्णांना चांगली सुविधा मिळत नाही, रुग्णालयामध्ये अस्वच्छता पसरली आहे या प्रकाराकडे रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने"जेपीएन न्यूज" वेबसाईट व दैनिक "जनतेचा महानायक" मध्ये ३० जून ते २ जुलै या तीन दिवसात पोस्टमार्टम हि मालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. या मालिकेमध्ये "सायन रुग्णालयाची सुरक्षा धोक्यात", "चांगल्या सुविधाअभावी रुग्णांची हेळसांड", "सायन रुग्णालयातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष" या तीन बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या.
या वृत्त मालिकेची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे हि वृत्तमालिका पुढील कारवाही साठी पाठवून योग्य ती कारवाई असे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने सायन मध्ये रुग्णांचे जे हाल चालले आहेत याबाबत दखल घेऊन आरोग्य विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याने येणाऱ्या काळात रुग्णांना चांगली सुविधा मिळण्याची शक्यता आहे.
