जून महिन्या पासून पावसाळा सुरु होतो. परंतू यावर्षी जुलै महिना सुरु झाला तरी अद्याप पाऊस पडलेला नसल्याने महाराष्ट्रामध्ये कित्तेक जिल्ह्यामध्ये पाणीसंकट निर्माण झाले आहे. कित्तेक जिल्ह्यामध्ये पाणीच नसल्याने ट्याण्कर द्वारे तर काही ठिकाणी काही दिवस आड करून पाणी पुरवठा केला जात आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये सध्या जरी पाणीपुरवठा निट होत असला सध्या २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. पाऊस न पडल्यास येणाऱ्या काळात मुंबईवर पाणी संकट निर्माण होणार आहे.
मुंबई महानगर पालिकेकडून ५ जुलैला प्रसिद्ध करण्यात आलेल्या पाण्याच्या आकडेवारीवरून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात १ लाख ४ हजार २६६ दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. मोडक सागर तलावामध्ये ५७७५७ दशलक्ष लिटर, तानसा तलावामध्ये ११७३५ दशलक्ष लिटर, विहार तलावामध्ये ३४८ दशलक्ष लिटर, तुळशी तलावामध्ये २६९२ दशलक्ष लिटर, भातसा तलावामध्ये ३१७३५ दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मुंबईला दररोज ३७०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात असल्याने उपलब्ध असलेला पाणीपुरवठा फक्त २८ दिवस इतकाच पुरणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात सरासरी ८० टक्के पाऊस पडला तरी मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. परंतू या वर्षी पावसाळ्याचा संपूर्ण जून महिना पूर्णपणे कोरडा गेला आहे. जुलैच्या सुरुवातीला मुंबई मध्ये दोन दिवस पाऊस पडला असला तरी तलाव क्षेत्रात पाऊसच पडला नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. हा लेख प्रसिध्द होई पर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त २६ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक राहिलेला असेल.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाऊस पडत नसल्याने हि परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस पडायचा असेल तर त्याला तसे वातावरण हि हवे असते. निसर्गाच्या नियमानुसार तसे पर्यावरण सुद्धा हवे असते. सर्वत्र झाडे तोडून मोठ्या प्रमाणात सिमेंटची जंगले उभी केली जात आहेत. कित्तेक प्रकल्प राबवताना झाडांच्या कत्तली केल्या गेल्या आहेत. हि तोडलेली झाडे पुन्हा लावण्यात आली कि नाही याची कधीही राज्य सरकार किवा पालिकेने शहानिशा केलेली दिसत नाही. दरवर्षी झाडे लावतो असे सांगितले जात असले तरी हि लावलेली झाडे जगवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही.
मुंबई मध्ये गेल्या काही वर्षामध्ये इमारतींचे पुनर्निर्माण मोठ्या संखेने झाले आहे. इमारती तोडून नव्याने इमारती उभ्या करताना सर्व इमारतींमध्ये पाऊसाचे पाणी जमिनीखाली विहीर खोदून वाचवण्यासाठी रेन हार्वेस्टिंग करावे, रेन हार्वेस्टिंग न करणाऱ्या इमारतींना ओसी प्रमाणपत्र देवू नये असा नियम असलेली योजना लागू करण्यात आली. परंतू पालिका अधिकारी आणि विकासक यांच्या मधील आर्थिक संबंधामुळे हि योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. मुंबई मधील काही मोजक्याच इमारतीमध्ये रेन हार्वेस्टिंग करण्यात आले आहे. महापौरांनी गेल्या वर्षी आणि या वर्षी दोन वेळा रेन हार्वेस्टिंगची श्वेतपत्रिका काढा असे आदेश प्रशासनाला दिले असले तरी अद्याप श्वेतपत्रिका काढण्यात आलेली नाही.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधून मुंबई पर्यंत पाणी येताना दररोज ७०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. हे गळती होणारे पाणी वाचवण्यात पालिकेला पाहिजे तसे यश आलेले नाही. मुंबईमध्ये पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने पाणी माफियांकडून दररोज १६० दशलक्ष लिटर पाण्याची चोरी ट्यान्कर द्वारे केली जाते. या पाणी चोरीमधून दिवसाला पाणी माफियांना ४ कोटी तर वर्षाला १४६० कोटी रुपयांचे उत्त्पन्न मिळत आहे. पाणी माफियांना मिळणाऱ्या या करोडो रुपयांमधून पालिका अधिकाऱ्याना सुद्धा मोठ्या प्रमाणात टक्केवारी मिळत असल्याने मुंबई मध्ये होणाऱ्या पाणी चोरीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यासर्व प्रकारांमुळे मुंबईमध्ये येणारे पाणी वाचवण्याची इच्छा पालिकेमध्ये नाही हे स्पष्ट होत आहे.
मुंबई मध्ये येताना होणारी पाणी गळती आणि पाणी चोरी थांबवली असती तरी मुंबईवर जी परिस्थिती येत्या काही दिवसामध्ये ओढवणार आहे त्या परिस्थिती पासून मुंबई आणि मुंबईकर नागरिकांना वाचवता आले असते. पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे मुंबईच्या वाट्याचे कित्तेक दशलक्ष लिटर पाणी वाचवता आले नसल्याने वाया गेले आहे. भारतामध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग कित्तेक वेळा फसला असताना मुंबई महानगर पालिकेने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. वाया जाणारे, चोरी होणारे पाणी वाचवण्यात अपयश आलेल्या पालिकेने आता कृत्रिम पावसाच्या नावाने मुंबईकर नागरिकांच्या करामधून मिळालेले १५ कोटी रुपये फुकट घालवण्याचे ठरवलेले आहे.
कृत्रिम पाऊस पाडायचा असल्यास सतत दोन तीन वर्षे हि प्रक्रिया केल्यावरच कृत्रिम पाऊस पाडता येतो. याची माहिती न घेताच पालिका अधिकारी कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी करत आहेत. यामुळे मुंबईकर नागरिकांचा पैसा फुकट घालवला जाणार आहे. पालिकेमधील सत्ताधारी पक्षाने हे प्रकार थांबवण्याची गरज असताना प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा अंकुश राहिला नसल्याने सत्ताधारी सुद्धा असे प्रकार थाबावायला अपयशी ठरले आहेत. प्रशासन आणि कमजोर सत्ताधारी यांच्याकडे नियोजन नसल्याने आज मुंबईवर पाणी संकट निर्माण झाले आहे असेच बोलावे लागणार आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३

No comments:
Post a Comment