कुर्ला बैल बाजार प्रसूतीग्रहाच्या उद््घाटनावरून सत्ताधारी घायाळ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कुर्ला बैल बाजार प्रसूतीग्रहाच्या उद््घाटनावरून सत्ताधारी घायाळ

Share This
विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर राजकीय कुरघोड्यांचे राजकारणही सुरू झाले आहे. याची 'नांदी' शुक्रवारी पालिकेच्या कुर्ल्याच्या नवीन प्रसूतीगृहाच्या उद््घाटनाच्या निमित्ताने झालीच. पालिका प्रशासनाकडून आयत्या वेळी निमंत्रण मिळूनही 'मुख्यमंत्र्यांचा मान' राखण्यासाठी या कार्यक्रमाला जाण्याचे 'आदेश' शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यामुळे सेनेच्या आक्रमक नगरसेवकांचा नाइलाज होऊन त्यांना येथे निमूटपणे हजर राहावे लागले. या कार्यक्रमाच्या उद््घाटनाबद्दल अंधारात ठेवल्यामुळे पालिका प्रशासनाचा निषेध करणार्‍या शिवसेना नगरसेवकांवर मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्याची नामुष्की ओढवल्याने पालिकेतील सत्ताधारी घायाळ झाल्याची स्थिती बघायला मिळत होती. प्रसूतीगृहाचे उद््घाटन पालिकेतील सत्तारूढ पक्षाला अंधारात ठेवून करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी आगपाखड केली. या उद््घाटनाची पूर्वतयारी गुरुवारी सकाळपर्यंत झाली नव्हती आणि तसा निर्णयही झाला नव्हता. गुरुवारी रात्री एका इफ्तार पार्टीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री नसीम खान आणि मुख्यमंत्री यांची भेट झाल्यावर हे उद््घाटन करण्याचा निर्णय झाला. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका सकाळी घाईघाईने छापण्यात आल्या. मात्र पालिकेची ही तयारी होत असताना सत्ताधारी पक्ष, मनसे, समाजवादी पक्ष आणि अन्य पक्षाचे गटनेते तसेच शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका मनाली तुळस्कर यादेखील अंधारात होत्या. सभागृह नेत्या विश्‍वासराव आणि फणसे यांनी या प्रकाराबद्दल पत्रकारांकडे संताप व्यक्त करताना सांगितले, या प्रकरणी सेना सभागृहात आवाज उठवून प्रशासनाला जाब विचारणार आहे. मुख्यमंत्री येणार असल्यामुळे त्यांचा अपमान होऊ नये म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत व सर्वजण त्याचे पालन करणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रण आयत्यावेळी मिळाल्यामुळे आपण उपस्थित राहिलो नाही, असे समाजवादी पक्षाचे नेते रईस शेख यांनी सांगितले. 

आपल्याला सकाळी निमंत्रण मिळाले, पण फेरीवाल्यांच्या मुद्दय़ावरून आपण पालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोर वडापावचा स्टॉल लावला असल्यामुळे कार्यक्रमाला गेलो नाही, अशी माहिती मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी दिली. या प्रसूतीगृहासाठी महापालिकेने पाच कोटी ८७ लाख रुपये खर्च केले आहेत. त्यासाठी रे रोड व देवनार येथील साधनसामग्री रातोरात बैलबाजार प्रसूतीगृहात हलवण्यात आली. तसेच येथील परिचारिका व कर्मचारी तातडीने नियुक्त करण्यात आल्या. या प्रसूतीगृहाच्या उद््घाटनाविषयी सर्व पक्षांना अगोदर कळवायला हवे होते तसेच महापौरांकडून मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणे आवश्यक होते, पण तसे न करता काँग्रेसच्या नेत्यांनी घाईघाईने हा उद््घाटन सोहळा घेतला, असा आरोप फणसे यांनी केला. या प्रकाराबद्दल शिवसेना पालिका आयुक्तांना जाब विचारण्यासाठी गेली होती, पण ते नसल्यामुळे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याकडे निषेध नोंदवला, अशी माहिती फणसे यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages