कमला नेहरू नगर २ वर्षांपासून पाण्यात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कमला नेहरू नगर २ वर्षांपासून पाण्यात

Share This
रहिवाशांच्या आरोग्याला धोका
धारावीतील प्रभाग क्रमांक १७६ मधील कमला नेहरू नगर, विजय नगर हा भाग मागील २ वर्षांपासून पाण्यात आहे. येथील २0/२५ कुटुंबे या समस्येने ग्रस्त असून लोकांच्या घरात पाणी शिरत आहे. गटाराचे पाणी साचल्यामुळे अनेक जण त्वचा रोग, डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजाराने रुग्णालयाच्या पायर्‍या चढलेले असून पिण्याच्या पाईपमध्ये गटरातील सांडपाणी मिसळून येथील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
मागील २ वर्षांत अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा येथील गटार सफाईची समस्या सुटली नसून येथील शिवसेनेच्या नगरसेविका अनुषा कोडम या फक्त आश्‍वासन देण्यापलीकडे दुसरे काही काम करत नसल्याची तक्रार येथील रहिवासी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी येथील काही महिला या नगरसेविकेला भेटून आल्या. नेहमीप्रमाणे त्यांनी तुंबलेली गटारे लवकरात लवकर साफ करू, असे आश्‍वासन दिलेले आहे. दोन दिवस उलटून गेले तरी नगरसेविका इथे फिरकल्याच नाहीत, अशी येथील नागरिकांची तक्रार आहे.

कमला नेहरूनगर व विजय नगर हा हिंदू स्मशानभूमी जवळील विभाग असून मागील दोन वर्षांपासून येथील रहिवासी हे पाण्यातून मार्गक्रमण करतच आपली रोजची कामे आटोपून घेत आहेत. येथील गटारे ही गेल्या दोन वर्षांपासून साफ केली गेली नसल्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. येथील नळाचे पाणी सकाळी ६.३0 वाजल्यापासून येते व ९ ते ९.३0 च्या दरम्यान जाते. त्यामुळे पाणी येण्याच्या वेळेत हा परिसर पूर्णपणे जलमय होऊन जातो. नाईलाजास्तव येथील रहिवासी हे पाण्यात राहायला मजबूर आहेत. सध्या मुंबईत पावसाची सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीत येथील नागरिकांचे काय हाल होत असतील याची कल्पनाच केलेली बरी. लोकप्रतिनिधी हे जनतेने निवडून दिलेले असतात. लोकांची कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधी असतात; पण हे लोकांच्या समस्या सोडवत नसतील, तर त्यांना पुन्हा का निवडून द्यावे, असा सवाल येथील रहिवासी करत आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages