नवी दिल्ली : येत्या १५ ऑगस्ट रोजी राजधानी नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर आयोजित स्वातंत्र्य दिन समारंभादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्यावहिल्या स्वातंत्र्य दिन संबोधनाचे साक्षीदार होण्यास उत्सुक असणार्या नागरिकांसाठी तब्बल दहा हजार आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर स्वातंत्र्य दिनानिमित्त दहशतवादी हल्ल्याचा धोका ओळखता लाल किल्ला परिसरातील सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी येत्या १५ ऑगस्ट रोजी सार्जया केल्या जाणार्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने प्रथमच लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करणार आहेत. हा ऐतिहासिक क्षण 'याचि देही याचि डोळा' पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्वसामान्यांसाठी लाल किल्ला परिसरात दहा हजार नागिरकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. लाल किल्ल्यासमोरील उजव्या बाजूला असलेल्या सार्वजनिक जागेत ही व्यवस्था करण्यात आली आहे. तर त्याच्या बाजूला प्राणप्रिय तिरंगा झेंड्यातील रंगाच्या वेशभूषेतील मुलांना बसण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी सांगितले.
यासोबतच दिल्ली परिवहन मंडळाने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी ६ ते १0 या वेळेत मंडळाच्या बसमधून प्रवास करणार्या नागरिकांकडून भाडे आकारणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच या काळात लाल किल्ल्याकडे जाणार्या बसेसच्या फेर्यांतही वाढ करत दिल्लीकरांना अनोखी स्वातंत्र्य दिन भेट दिली आहे. सकाळी १0 वाजेपर्यंत मोफत प्रवासाची ही योजना संपूर्ण दिल्लीत लागू असेल, असेही परिवहन मंडळाने म्हटले आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनानिमित्त दहशतवादी हल्ल्याचा धोका ओळखता राजधानीसह लाल किल्ला परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजूबाजूला सुरक्षारक्षकांचे कडे असणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यापूर्वी पंतप्रधान राजघाटावरील महात्मा गांधींच्या समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेणार आहेत. देशाचे पंतप्रधान स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दरवर्षी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करतात. |
