नवी दिल्ली : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला 'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करणे हा देशाचा अपमान होता, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे सेवानवृत्त न्यायाधीश तथा प्रेस कौन्सिलचे विद्यमान अध्यक्ष न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी शनिवारी व्यक्त केले.
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व अभिनेत्री रेखाला राज्यसभेचे सदस्यत्व देण्यावरून सध्या चांगलेच राजकारण तापले आहे. क्रीडा व कला क्षेत्राशी संबंधित असलेल्या या दोन्ही दिग्गजांनी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यसभेच्या बैठकांना दांडी मारल्यामुळे काही सदस्यांनी त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. या मागणीवर संसदेत खमंग चर्चा सुरू असतानाच प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी शनिवारी सचिनला 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करणे आणि रेखाला संसदेचे सदस्यत्व बहाल करणे हा देशाचा अपमान होता, असे परखड मत व्यक्त केले आहे. तेंडुलकरला 'भारतरत्न' देणे व रेखाला संसदेचे सदस्यत्व प्रदान करणे हा देशाचा अपमान होता. 'भारतरत्न'चे खरे मानकरी तर सुब्रमण्यम भारती, डॉ. कोटनीस आणि मिर्झा गालिब हे आहेत, असे न्यायमूर्ती काटजू यांनी ट्विटरवर लिहिले आहे. सचिन व रेखाचे राज्यसभेत कोणते योगदान आहे? याचे उत्तर 'एक मोठा झिरो' असे आहे. असे असेल तर त्यांना खासदारकी कशासाठी देण्यात आली? असा सवालही त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे. दरम्यान, काटजू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. सोनियांची १ अब्ज २५ कोटी भारतीयांवर (ज्यांना त्या मूर्ख समजतात) राहुल गांधींना लादण्याची इच्छा आहे. इंदिरा गांधींनीही असेच आमच्यावर संजय गांधींना लादण्याचा प्रयतन केला होता, असे ते म्हणाले. |
