मुंबई - नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. माणिकराव साळुंखे यांची निवड करण्यात आली. राज्यपाल व कुलपती डॉ. के. शंकरनारायणन यांनी ही निवड केली. डॉ. साळुंखे यांनी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही काम पाहिले आहे. त्यानंतर राजस्थान केंद्रीय विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू म्हणून त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. तसेच जम्मू केंद्रीय विद्यापीठात मानद सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. मुंबईत इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या संचालकपदाचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे.
कुलगुरुपदासाठी नियुक्त केलेल्या शोध समितीने शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांच्या राज्यपालांनी मुलाखती घेतल्या. कोलकता उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जे. एन. पटेल शोध समितीचे प्रमुख होते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार यांचे 21 जानेवारी 2014 रोजी निधन झाले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या नावावर 134 शोधनिबंध व एक पेटंट आहे. 1976 ते 1979 या कालावधीत यूजीसी रिसर्च फेलो आणि 1983 मध्ये यूजीसी नॅशनल असोसिएटस म्हणून त्यांना बहुमान मिळाला होता.

No comments:
Post a Comment