मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी): भारतीय राज्यघटनेनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू आहे. पण धनगरऐवजी धनगड असा अनवधनाने उल्लेख झाला असल्याने महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे धनगडऐवजी धनगर अशी दुरूस्ती करण्याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारला शिफारस करावी, या मागणीसाठी धनगर समाज येत्या १४ ऑगस्ट रोजी राज्यभरात चक्का जाम आंदोलन करणार आहे.
प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी तमाम धनगर समाज रास्ता रोको, ठिय्या आंदोलन करेल. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे हे आंदोलन करावे लागत आहे. त्यामुळे आंदोलनामुळे जो काही परिणाम होईल, त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारचीच असेल, असे कृती समितीचे अध्यक्ष हनमंतराव सूळ व कार्याध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी म्हटले आहे.
मुंबईतही रेल रोखो, रास्ता रोको
आरक्षणाच्या अंमलबजाणीच्या मागणीसाठी मुंबई, वसई-विरार, नवी मुंबई येथे रास्ता रोको, रेले रोखो अशी आंदोलने करण्यात येणार आहेत. या आंदोलनामध्ये मुंबई व परिसरात राहात असलेला धनगर समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे समितीचे समन्वयक नवनाथ पडळकर यांनी सांगितले आहे.
तिस-या सुचीला विरोध
धनगर समाजाला भारतीय राज्य घटनेने एसटीचे आरक्षण दिलेले आहे. धनगड म्हणजेच धनगर याचे शेकडो शासकीय पुरावे कृती समितीकडे उपलब्ध आहेत. हे पुरावे राज्य सरकारकडे सादर करूनही केवळ धनगर समाजाची प्रगती होऊ नये म्हणून राज्य घटनेतील आरक्षणाची अंमलबजावणी केली जात नाही. आता मूळ मागणीला बगल देण्यासाठी राज्य सरकारने तिस-या सुचीचे खूळ काढले आहे. परंतु त्याला राज्यातील समस्त धनगर समाजाचा तीव्र विरोध असल्याने सरकारने अशी कारस्थाने करू नयेत. अशा कारस्थानांमुळे धनगर समाजामध्ये सरकारविरोधात आणखी चीड निर्माण होईल. त्यामुळे आम्हाला भारतीय राज्य घटनेने दिलेल्या एसटीच्या आरक्षणापासून राज्य सरकारने पळ काढू नये, असेही पडळकर यांनी सांगितले.
