आंबेडकर महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेची चौकशी करून कारवाही करू = डॉ. देशमुख
मुंबई / अजेयकुमार जाधव
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या चेम्बूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील केंद्रामध्ये सावळा गोंधळ सुरु आहे. विद्यापीठाच्या आदेशांना केराची टोपली दाखवली जात आहे. याची गंभीर दखल यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने घेतली असून महाविद्याला मधील प्रवेश प्रक्रियेची चौकशी करून योग्य ती कारवाही करणार असल्याची माहिती विद्यापीठाचे मुंबई येथील संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चेम्बूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र चालते. सध्या सर्व केंद्रांवर प्रवेश प्रक्रिया चालू असून अंतिम प्रवेशासाठी २३ ऑगस्ट अशी शेवटची तारीख विद्यापीठाने ठरवून दिली आहे. असे असतानाआंबेडकर महाविद्यालयाने विद्यापीठाने एक फतवा काढला असून आम्ही १८ ऑगस्ट नंतर कोणतेही प्रवेश अर्ज स्वीकारणार नाही असे या फतव्यामध्ये म्हटले आहे.
तसेच या केंद्रावर आधी दिवसभर अर्ज देण्याचे आणि घेण्याचे काम केले जात होते. परंतू ७ ऑगस्ट पासून दुपारी २. ४५ ते ४. ३० या वेळातच अर्ज स्वीकारण्याचे व इतर कार्यालयीन कामकाज केले जाईल असेही या फतव्यात म्हटले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कामाच्या सुट्ट्या टाकून येथे प्रवेश प्रक्रियेसाठी खेपा मारव्या लागत आहेत. कधी कधी तर केन्द्रावर काम करणारी महिला कर्मचारी येतच नसल्याने विद्यर्थ्यांचे नुकसान होत आहे.
मुक्त विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेचे अर्ज (फॉर्म) मोफत दिले असताना विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाकडून ५० ते २० रुपयांना अर्ज विकण्यात आले आहेत. यामुळे आंबेडकर महाविद्यालामध्ये प्रवेश प्रक्रियेच्या नावाने चाललेला सावळा गोंधळ थांबवून विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी केली जात आहे.
२३ ऑगस्ट हिच अर्ज स्वीकरण्याची शेवटची तारीख आहे. यामध्ये कुठलेही बदल केलेले नाहीत. आंबेडकर महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. पत्रकारानेही प्रवेश प्रक्रियेमध्ये कसा सावळा गोंधळ चालू आहे हे दूरध्वनीवरून माझ्या निदर्शनास आणले आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांकडून लेट फी घेतली जाणार नाही. ज्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्जाचे पैसे घेतले गेले आहेत त्यांना त्यांचे पैसे परत करायला लावू. या प्रकरणी चौकशी समिती नेमली आहे. हि समिती ,महाविद्यालयामध्ये जावून चौकशी करून अहवाल सादर करेल. समितीचा अहवाल आल्यावर महाविद्यालयावर योग्य ती कारवाही केली जाईल.
डॉ. प्रकाश देशमुख - मुंबई विभागीय संचालक


No comments:
Post a Comment