मुंबई: महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र सरकार व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्यामार्फत महिला व मुलींसाठी विस्तारित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा सोहळा धारावी क्रीडा संकुल नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार मा. एकनाथ गायकवाड, तसेच ‘माविम’ च्या व्यवस्थापकीय संचालक कुसुमताई बाल सराफ, नटराजन आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रात माविमने स्थापन केलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटांतील महिलांना कौशल्यपर प्रशिक्षण देण्याची सुरुवात मुंबई येथील गटांपासून करण्यात येणार आहे. या महिला व मुलीना ड्रायव्हींग (लायसन्स सहित), फोटोग्राफी व व्हिडिओ शुटींग, हॉस्पिटलीटी मॅनेजमेंट, घरगुती उपकरणांची दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, सिक्युरिटी गार्ड, फॅशन डिझायनिंग, इमिटेशन ज्वेलरी, सॉफ्ट टॉइज, नर्सिंग असिस्टंट, रीटेल मॅनेजमेंट, ब्युटी पार्लर, मुलभूत संगणक प्रशिक्षण, डी.टी.पी. टॅली, इ. प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देण्यात येईल व त्याचप्रमाणे प्लेसमेंटसाठी सहकार्यही करण्यात येईल.
या प्रसंगी बोलताना मा. वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘माविम’ची व्याप्ती आता मुंबईतही वाढत आहे. तेव्हा महिलांनी याचा फायदा घ्यावा. मिळणारे प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण करा. यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. ते एका दिवसात मिळत नाही. ‘माविम’ व भारतीय महिला बँक यांच्यातील करारामुळे आता कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कर्ज मिळणे शक्य झाले आहे. त्याचा लाभ घ्या. स्वतःचे अस्तित्व निर्माण करा. ड्रायव्हींगसारख्या क्षेत्रातही तुम्ही नाव कमवू शकता. गरज आहे ती, मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा योग्य उपयोग करण्याची. या शब्दात त्यांनी महिलांना त्याच्यावरील जबाबदारीची जाणीव करून दिली. या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
