"राईट टू पी‘ कार्यकर्त्यांनी सत्ताधार्यांना सुनावले
मुंबई / अजेयकुमार जाधव - शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी चार वर्षे मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष असताना आरटीपीच्या कार्यकर्त्यांना ५०० मुताऱ्या महिलांसाठी उभारण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आजतागायत ते पूर्ण करण्यात आलेले नाही असे "राईट टू पी‘ कार्यकर्ते मुमताज शेख आणि सुप्रिया सोनार यांनी मुंबईच्या महापौरांना सुनावल्या वर खडबडून जागे झालेल्या महापौर सुनील प्रभू यांनी मुंबई शहरातील स्वच्छतागृहांची साफसफाई आणि नवीन स्वच्छतागृहांची बांधणी ही कामे तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी नोडल ऑफिसर नेमण्याचे आश्वासन "राईट टू पी‘ (आरटीपी) कार्यकर्त्यांना दिले.
नुकतीच महापौरांची भेट घेतल्यानंतर आरटीपी कार्यकर्त्यांनी मंगळवारी पुन्हा त्यांची निवासस्थानी भेट घेतली. या वेळी मुंबईतील स्वच्छतागृहांचे प्रश्न आणि त्याच्याशी निगडित समस्यांवर आधारित चित्रफीत महापौरांना दाखवण्यात आली. त्यावर महापौरांनी काही ठिकाणी स्वच्छतागृहांची देखरेख नीट होत नसल्याचे त्यांनी मान्य केले. महापौरांनी या वेळी स्वच्छतागृहांची जबाबदारी घेण्यास अधिकारी तयार होत नसल्याची खंत व्यक्त केली. याबाबत सर्व माहिती घेऊन योग्य ती पावले उचलण्यासाठी नोडल अधिकारी नेमण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकारी नेमण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. स्वच्छतागृहांशी संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांशी आठ दिवसांनंतर चर्चा करण्याचे आश्वासनही प्रभू यांनी दिले.
दरम्यान गेले १७ वर्षे पालिकेमध्ये सत्ता असूनही सत्ताधारी शिवसेनेकडून आश्वासने दिली जात आहेत. या आश्वासनांचे पालन केले जात नाही यामुळे महिलांच्या समस्यांबाबत आश्वासनाचे पालन न झाल्यास "राईट टू पी‘चे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि महिलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणारे पालिकेचे अधिकारी आणि येथील राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी गनिमी काव्याने आंदोलन करतील असा इशारा कार्यकर्त्या प्रियंका सोनार व मुमताज शेख यांनी दिला आहे.
