बड्या उद्योजकांवर पालिका मेहेरबान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बड्या उद्योजकांवर पालिका मेहेरबान

Share This
मुंबई - सामान्य नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यात अनास्था दाखवणाऱ्या महापालिकेने बड्या उद्योजकांसाठी मात्र पायघड्या अंथरण्याचे धोरण अवलंबले आहे. मुंबईत व्यवसाय करण्यासाठी आणि नफा कमावण्यासाठी आलेल्या बड्या उद्योजकांच्या दोन कंपन्यांना एक रुपया नाममात्र भाड्याने पाच हजार चौरस फूट जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या मुद्द्यावर कॉंग्रेसने प्रशासनाला धारेवर धरले. पैसे कमावण्यासाठी आलेल्या कंपन्यांवर इतकी मेहेरबानी करण्याचा पालिकेचा उद्देश काय, असा सवालही कॉंग्रेसच्या सदस्यांनी केला. प्रशासनाने हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला. 

भांडुप आणि अंधेरी पश्‍चिम भागात 24 तास पाण्याचा पुरवठा करण्याची पालिकेची योजना आहे. त्यासाठी स्विस एन्व्हायर्न्मेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सल्लागार म्हणून नेमण्यात आले आहे. कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या या कंपनीला येथे कार्यालय बांधायचे आहे. त्यासाठी पालिकेने आरोग्य केंद्र आणि ग्रंथालयासाठी आरक्षित असलेल्या भूखंडाची जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन हजार चौरस फुटाचा हा भूखंड वांद्रे येथे अभिनेता शाहरूख खान याच्या बंगल्यासमोर आहे. या कंपनीला कार्यालयासाठी एक रुपये नाममात्र भाड्याने तो पालिकेने दिला आहे. कॉंग्रेसचे नगरसेवक असीफ झकेरिया यांनी आज प्रशासनाच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर हरकतीच्या मुद्द्याद्वारे जोरदार आक्षेप घेतला. सदस्यांचा जोरदार विरोध पाहून हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात आला आहे. 

शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्यासाठी "एलईए‘ कंपनीशी संलग्न असलेल्या साऊथ एशियन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कार्टर रोडमधील समाजकल्याण केंद्रासाठी आरक्षित असलेल्या तीन हजार चौरस फूट भूखंडापैकी एक हजार चौरस फूट जागा पालिकेने देऊ केली आहे. ही जागाही एक रुपया इतक्‍या नाममात्र भाड्याने दिली आहे. या कंपनीचे कार्यालय ठाण्यात आहे. त्यांना मुंबईत काम करणे सोईचे व्हावे, यासाठी पालिका उदार झाली आहे, असे असीफ झकेरिया यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages