महापौरपदाची माळ बौद्धांच्या गळ्यात पडणार का ? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापौरपदाची माळ बौद्धांच्या गळ्यात पडणार का ?

Share This
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या आणि एका राज्याचा अर्थसंकल्प असेल अश्या मुंबई महानगर पालिकेच्या महापौर पदाला मोठा मान आहे. मुंबईचे महापौर पद आपल्याला मिळावे अशी कित्तेक नगरसेवक आणि नगरसेविकांची इच्छा असते. शनिवारी १६ ऑगस्ट ला महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या नुसार मुंबईचे महापौरपद अनुसूचित जातीच्या महिला नगरसेविकेला मिळणार हे स्पस्ष्ट झाले आहे. 

मुंबईच्या महापौरपदी अनुसूचित जातीच्या महिलेची वर्णी लावावी लागणार असल्याने सत्ताधारी शिवसेनेकडे असलेल्या अनुसूचित जातीच्या डॉ. भारती भावदाने, यामिनी जाधव व स्नेहल आंबेकर यांच्या नावाची चर्चा सध्या जोरात आहे. डॉ. भारती भावदाने व यामिनी जाधव या बौद्ध समाजाच्या आहेत तर स्नेहल आंबेकर या चर्मकार समाजाच्या आहेत. डॉ. भारती भावदाने यांनी एमबीबीएस चे शिक्षण घेतले असून यामिनी जाधव व स्नेहल आंबेकर या दोघीही पदवीधर आहेत. 

महानगर पालिकेमध्ये एक अभ्यासू नगरसेविका म्हणून यामिनी जाधव यांचे नाव आहे. त्यांचे पती यशवंत जाधव हे शिवसेनेचे नगरसेवक होते, सध्या ते शिवसेनेचे उपनेते आहेत. शिवसेनेमध्ये असले तरी ते कधीही बौद्ध समाजापासून दूर गेलेलं नाहीत, त्यांनी बौद्ध समाजाच्या प्रश्न नेहमीच उचलून धरले आहेत. बौद्धधर्मीय नगरसेविका म्हणून यामिनी जाधव यांचे नाव सगळ्यांना परिचित आहेत. यामिनी जाधव या महापौर पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. 

यामिनी जाधव या बौद्ध असल्या तरी त्या खुल्या मतदारसंघामधून निवडून आल्या आहेत. यामुळे त्यांना महपौर पद मिळू नये असे काही लोकांचे म्हणणे आहे. महापौर पद हे एखाद्या अनुसूचीत जातीमधून निवडून आलेल्या वार्ड साठी नसून ते अनुसूचित जातीच्या लोकांसाठी राखीव आहे याचा विचार शिवसेना करेलच याबाबत शंका आहे. यामुळे यामिनी जाधव यांना महपौर पद न देता डॉ. भारती भावदाने व स्नेहल आंबेकर यांच्यामधील कोणाला तरी महापौर पद द्यावे असा विचार आहे. भावदाने या डॉक्टर असल्याने उच्चशिक्षित आहेत यामुळे भारती भावदाने यांचा विचार केला जाऊ शकतो. 

शिवसेनेने कधीही बौद्ध धर्मियांना पुढे यायला दिलेली नाहीत. नुकतीच लोकसभा निवडणूक झाली यावेळीही दादरच्या दक्षिण मध्य मुंबई या मतदार संघामध्ये अनुसूचित जातीची मते मोठ्या प्रमाणात आहेत. याठिकाणी उमेदवार देताना बौद्ध धर्मीय उमेदवार न देत सेनेने चर्मकार समाजाच्या राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिली होती. एकीकडे आम्ही जात पात पाळत नाही, शिवसेनेमध्ये जातीभेद नाही असे सांगितले जात असताना बौद्धांवर मात्र अन्याय होत आलेला आहे. 

सेनेकडून नेहमी आम्ही क्वालिटीला महत्व देतो असे बोलले जाते. पण सध्याचे महापौर सुनील प्रभू हे फक्त १२ वि पास आहेत . प्रभू यांना बघितल्यास सेनेचे आदेश पाळणारा कार्यकर्ता याच्याव्यतिरिक्त अशी कोणतीही क्वालिटी त्यांच्यामध्ये दिसलेली नाही. प्रशासनाला साताधार्यानी कामाला लावाचे असते सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश असावा लागतो. पण सेनेकडून क्वालिटी पाहून दिलेले महापौरांना प्रशासन किंम्मत देत नसल्याचे कित्तेक प्रसंगांवरून उघड झाले आहे. 

महापौर हा सत्ताधारी पक्षाचा असला तरी त्या पालिका क्षेत्राचा प्रथम नागरिक असतो. त्याने भेदभाव करायचा नसतो पण सध्याच्या महापौरानी आपल्या कार्यकाळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये भेदभाव करण्यातच आपली कारकीर्द घालवली आहे. महापौर हे उच्च शिक्षित नसल्याने त्यांना अनेकवेळा प्रशासन सांगेल तसेच करावे लागले आहे. यामुळे सत्ताधारी शिवसेनेची म्हणावी तशी प्रतिमा मुंबईकर नागरिकांमध्ये करता आलेली नाही. सेनेकडून लोकसभेचा उमेदवार देतानाही चर्मकार समाजाला झुकते माप दिले आहे. 

मागील महानगर पालिका निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्षाला सोबत घेण्यात आले. काही कमी पडणारी मते रिपाई मुळे महायुतीला मिळाली. मुंबईच्या महापौर पदी शिवसेनेचा उमेदवार बसवण्यात आला. महापौर पद मिळाले, सत्ता आली तरी म्हणावे तसे रिपाई ला शिवसेनेने स्थान आणि सत्तेमध्ये हिस्सा दिलेला नाही. इतकेच नव्हे तर रामदास आठवले यांना खासदार व्हायचे होते. आठवले यांनी मातोश्रीवर कित्तेक खेपा मारल्या पण आठवले यांना सेनेने आपल्या कोठ्यातून किवा महाराष्ट्रातून खासदार म्हणून पाठवलेले नाही. 

बौद्ध धर्मीय म्हणणाऱ्या आठवले यांना इतका वाईट अनुभव आला तरीहि त्यानी महायुती तोडली नाही. महायुती मधून पुन्हा लोकसभेच्या जागा मिळवण्याचा प्रयत्न केला. जागा मागून मागून थकलेल्या आठवले यांच्या पदरात एकमेव साताऱ्याची पडेल जागा टाकण्यात आली. ६० टक्के बौद्ध आणि ४० टक्के इतर लोक अश्या बाबासाहेबांच्या संकल्पनेवर चालणाऱ्या आठवले यांना महायुतीच्या दबावामुळे या एकमेव जागेवर बौद्ध धर्मीय उमेदवार देत आलेला नाही. 

शिवसेनेला बौद्ध धर्मियांनी कधीही आपले मानलेले नाही. शिवसेनेनेही बौद्ध धर्मियांना पाहिजे तसे महत्व दिलेले नाही. त्यातच सध्या महायुतीच्या नावाने राजकारण करताना बौद्ध धर्मीय म्हणवणाऱ्या आठवले यांची जी गात केली जात आहे. यामुळे आठवले समर्थकांमध्ये रोष निर्माण होत नसला तरी बौद्ध धर्मीयांमध्ये सेने वरोधात रोष आहे. बौद्ध धर्मियांना नामांतर सारख्या प्रश्नावर सेनेने केलेली वक्तव्य आजही लोकांना माहित आहेत. या सर्व कारणांनी सेनेविरोधातील संतापामध्ये बौद्ध धर्मीयांमध्ये वाढ होत चालली आहे. 

महाराष्ट्रामध्ये विधान सभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सेनेविरोधात एकीकडे बौद्ध धर्मियांत वाढत चाललेला संताप लक्षात घेता नव्याने महापौर निवडताना शिवसेनेला बौद्ध धर्मीयांबाबत आपल्याकडून झालेली चूक सुधारण्याची संधी चालून आलेली आहे. बौद्ध धर्मीय यामिनी जाधव या आपल्या शिवसेनेसाठी आयुष्य खर्ची करणाऱ्या यशवंत जाधव यांच्या पत्नी व अभ्यासू नगरसेविका आहेत तर भारती भावदाने या डॉक्टर आहेत. सेनेने आपण जातीभेद करत नाही हे दाखवण्यासाठी आता या दोघींपैकी एकीला महापौर पदी बसवण्याची गरज आहे. 

महापौरपदी अनुसूचित जातीच्या महिलेची वर्णी लावायची असल्याने आता शिवसेनेला अनुसूचित जातीमधील बौद्ध आणि चर्मकार समाजापैकी एकाला स्थान द्यावे लागणार आहे. लोकसभेमध्ये चर्मकार समाजाला दक्षिण मध्य मुंबई मधून संधी दिली असल्याने आता बौद्ध धर्मियांना संधी देण्याची वेळ आली आहे. शिवसेनेकडून नेहमी चर्मकार समाजाला झुकते माप दिले गेल्याने आता पुन्हा महापौर पदी चमकार समाजाची महिला बसवल्यास शिवसेना पक्की जातीवादी आहे असा संदेश मुंबईकर आणि महाराष्ट्रातील लोकांपर्यंत जाणार आहे. 

अजेयकुमार जाधव 
मो. ९९६९१९१३६३

फोटो - महापौर पदाच्या शर्यतीमधील उमेदवार 
नगरसेविका यामिनी जाधव           
( २०७) ( बौद्ध )
  

डॉ. भारती बावदाने  ( बौद्ध )
स्नेहल अंबेकर (१९४) चर्मकार 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages