मंत्रालयात दर बुधवारी आठवडा बाजार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 August 2014

मंत्रालयात दर बुधवारी आठवडा बाजार

मुंबई - महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात आठवड्याचा बाजार भरतो. नागरिकांतील ही प्रथा कॉंग्रेस आघाडी सरकारनेही मंत्रालयात रूढ केली आहे. जिल्हास्तरावर नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे मंत्रालयात मंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांना मुंबईची वाट धरावी लागत आहे. परंतु मंत्रीमहोदय मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने भेटतील म्हणून बुधवारी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मंत्रालयात येणार्‍या नागरिकांची संख्या वाढत असून आज ही संख्या सात हजारांवर गेली होती. त्यामुळे मंत्रालयाचा परिसर आणि मंत्रालयातील सहा मजले गर्दीने फुलून गेले होते. 

कॉंग्रेस आघाडी सरकारच्या निष्क्रिय आणि असंवेदनशील कारभारामुळे राज्यातील अनेक विकासकामे खोळंबली असून नागरिकांच्या समस्यांकडेही दुर्लक्ष केले आहे. शिवाय अनेक मंत्री मंत्रालयाकडे फिरकत नसल्याने नागरिकांना नाइलाजाने रिकाम्या हाताने परत जावे लागत आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता जारी झाल्यास सर्व प्रयत्न फुकट जातील म्हणून नागरिकांना मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. एरव्ही मंत्रालयात येणार्‍या नागरिकांची संख्या तीन ते चार हजारांच्या घरात जाते, मात्र दर बुधवारी होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीनिमित्ताने मंत्री मंत्रालयात येतात हे माहीत असल्याने मंत्रालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर आज नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती.

आज जनता जनार्दन प्रवेशद्वारातून ३२५० च्या आसपास तर गार्डन गेट येथून ४३०० पेक्षा अधिक लोकांना मंत्रालयात सोडण्यात आल्याची माहिती मिळाली. नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे मंत्रालयातील सहाही मजल्यांवर अक्षरशः आठवड्याचा बाजार भरल्याचे चित्र दिसत होते. गेल्या महिनाभरात दर बुधवारी दिसणारे हे दृश्य आणखी किमान एक आठवडा तरी दिसेल, असे सांगणारे सुरक्षा रक्षक प्रवेशद्वारावरील गर्दीला आवरताना मात्र घामाघूम झाल्याचे दिसत होते.

पत्रांचा खच वाढला
नागरिकांच्या वाढत्या संख्येमुळे विशेषकरून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालय, गृह विभाग, ग्रामविकास, नगरविकास, वित्त विभाग, सार्वजनिक बांधकाम तसेच सामाजिक न्याय विभाग आदी महत्त्वाच्या मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी दिसत होती. या विभागात नागरिकांच्या समस्यांसंदर्भात पत्रांचा ओघ वाढला असून दिवसाला जवळपास ४५० ते ५०० पर्यंत पत्रे येत असल्याचे काही कर्मचार्‍यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS