‘महिला बीट मार्शल’ मोटारसायकलवरून मुंबईत गस्त घालणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 August 2014

‘महिला बीट मार्शल’ मोटारसायकलवरून मुंबईत गस्त घालणार

मुंबई - मुंबई पोलीस दलाला आणखी एक भक्कम पाठबळ मिळाले. महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी आजपासून पोलिसांच्या २०५ ‘मर्दानी’ मैदानात उतरल्या. या धाडसी आणि प्रशिक्षित ‘महिला बीट मार्शल’ मोटारसायकलवरून अवघ्या मुंबईत बेधडक गस्त घालणार आहेत. असे महिला बीट मार्शल तयार करणारे मुंबई पोलीस दल देशातील पहिलेच असून महिला आणि बालकांवरील गुन्हे निश्‍चितच घटतील असा विश्‍वास गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज येथे व्यक्त केला. 

महाराष्ट्र पोलीस दलात मोठ्या संख्येने महिला आहेत. या वर्षी दलामध्ये ४५०० महिला सहभागी झाल्यात. पुढच्या चार वर्षांत २० हजार महिला अंमलदारांची भरती करण्याचे आमचे लक्ष असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला सिने अभिनेत्री राणी मुखर्जी हिने उपस्थित राहून महिला बीट मार्शलना प्रोत्साहित केले. याप्रसंगी राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ, महिला आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा, सहआयुक्त धनंजय कमलाकर, भारतकुमार उपाध्याय, सदानंद दाते, पोलीस उपायुक्त बी. जी. शेखर, अतुल पाटील तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

चूक झाली तरी पाठिंबा मिळेल
या बीट मार्शलच्या कामात एखादी चूक झाली तरी आम्ही ती बोनाफाइड चूक म्हणून समजू. चांगल्या कामासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबाच देऊ, असेही आर. आर. पाटील म्हणाले.

इथे ठेवणार वॉच
महिला बीट मार्शल या नेमलेल्या पोलीस ठाणे हद्दीतील मंदिर, शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक, बाजार परिसर, मॉल्स, समुद्रकिनारे, गर्दीची ठिकाणे तसेच महिलांची वर्दळ जास्त असेल तेथे गस्त घालतील. शहरातील असे ६७२ पॉइंट आम्ही टार्गेटवर आणले असून त्यावर या बीट मार्शलचा वॉच राहील, असे आयुक्त राकेश मारिया यावेळी म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS