दहीहंडी फोडण्याच्या नादात नियम पायदळी - २३४ गोविंदां जखमी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दहीहंडी फोडण्याच्या नादात नियम पायदळी - २३४ गोविंदां जखमी

Share This
दहीहंडी फोडण्याच्या नादात १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना थरांवर चढवू नका आणि थरावरील प्रत्येक गोविंदाला सुरक्षाकवच पुरवा हे खुद्द सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश सोमवारी मुंबई-ठाण्यात अक्षरशः पायदळी तुडवले गेले. उंचावर बांधलेल्या हंड्या फोडण्यासाठी हिरीरीने लावल्या गेलेल्या गोविंदांच्या बेभान थरांत अनेक ठिकाणी लहानग्यांना चढवण्यात आले होते. काही अपवाद वगळता सुरक्षेबाबतचे नियम तर पूर्णतः दहीहंडीलाच टांगण्यात आले होते. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी डीजेच्या आवाजाची मर्यादा ६५ डेसिबल राखण्याच्या पोलिसांच्या सूचना न ऐकता अनेक मंडळांनी दणदणाटी गोंगाटाची हंडी बांधली होती. अनेक ‌ ठिकाणी हंडीचे आयोजक असलेले बडे राजकीय नेते, हंडी फोडणारी मंडळे तसेच थरांवर चढलेल्या १२ वर्षांखालील मुलांचे पालक यांच्यावर आता काय कारवाई होणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दहीहंडीचा उत्सव उत्साहात, मात्र सुरक्षित रीतीने व्हावा, यासाठी यंदा कोर्टांत लढे झाले. त्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश प्रत्यक्षात पाळले जातात का, याकडे सोमवारी सगळ्यांचे लक्ष होते. मात्र आदेशांची अंमलबजावणी फारशी झालीच नाही. जखमी गोविंदांचा रात्रीपर्यंत हाती आलेला आकडा २३४ इतका होता. हा आकडाच सुरक्षेचे नियम पाळले गेले नसल्याचे द्योतक होता. गोविंदा मंडळाच्या पथकांमध्ये बालगोविंदा आहेत का याची चाचपणी पोलिसांकडून सुरू असली तरीही राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांचेही फारसे चालू शकले नाही.

बारा वर्षाखालील मुलांना दहीहंडीच्या थरांत घेण्यास कोर्टाने निर्बंध केले असतानाही अनेक गोविंदा मंडळांनी लहान मुलांना शेवटच्या थरावर चढवले. विशेष म्हणजे, आयोजकांनीही त्यांना रोखले नाही. सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचनांनाही आयोजकांनी हरताळ फासला. अनेक ठिकाणी सेफ्टी रोप किंवा सेफ्टी उपकरणांचा वापर न करताच दहीहंडीचा खेळ सुरू होता. काही मंडळांकडून नियम मोडले गेल्याचे दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनीही मान्य केले.

७ वर्षांची प्राप्ती वरच्या थरावर
ठाण्यातील बहुचर्चित जीतेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात नऊ थरांचा मनोरा रचताना जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा मंडळाने शेवटच्या थरावर ७ वर्षांच्या चिमुरडीला चढवून कोर्टाचे निर्देश पायदळी तुडवले. प्राप्ती देसाई असे तिचे नाव असून ती मुंबईतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत असल्याची माहिती तिच्याच पालकांनी दिली. वयाची विचारणा केली असता ती मुलगी १२ वर्षांवरील असून तिचा जन्मदाखला आपल्याकडे असल्याचे काही पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. 'आमच्या पथकातील वरच्या थरांतील मुले जखमी झाल्यामुळे प्राप्तीला वरच्या थरावर चढवण्यावाचून पर्याय राहिला नाही,' असे 'जय जवान'चे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी सांगितले. कॅबिनेट मंत्री जीतेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता, त्यांच्याच दहीहंडीत झालेल्या या प्रकारावर सरकार आता काय कारवाई करणार, असा प्रश्न उप​स्थित केला जात आहे.

एक गोविंदा मृत्युमुखी
ठाण्यात वर्तकनगर भागात रस्त्यावरून चालताना हार्ट अॅटॅक आल्याने राजेंद्र धोंडू आंबेकर (४६) या गोविंदाचा मृत्यू झाला. आंबेकर हे मुंबर्ईतील लालबाग येथील रहिवासी होते. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी हालचाली करण्यात आल्या; पण तेथे पोहचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

ठाणे पोलिसांचा 'आवाजबंद
दहीहंडी उत्सवातला आवाज ६५ डेसिबल्सपेक्षा जास्त झाल्यास स्पीकर्स जप्त करण्यासोबत आयोजक डीजे आणि साऊंड व्यावसायिकांवर कठोर कारवाईचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला होता. परंतु, जवळपास सर्वच ठिकाणी पोलिस कारवाईचा आवाज मात्र फिका पडला. पोलिसांनी एकाही उत्सवाच्या ठिकाणी साऊंडचे साहित्य जप्त केले नाही. उलट, ध्वनिप्रदूषण सुरू असल्याच्या ठिकाणी आयोजकांच्या व्यासपीठावर बसून पोलिस मानसन्मान घेताना दिसत होते. याबाबत पोलिस आयुक्त विजय कांबळे यांना विचारणा केली असता, पोलिस पथके ठिकठिकाणी आवाजाचे रीडिंग घेत आहेत. नियमांचे उल्लंघन झाले आहे, त्या आयोजकांवर मंगळवारी गुन्हे दाखल होतील अशी माहिती त्यांनी दिली.

''वरच्या थरांत जाणाऱ्या मुलांच्या वयाचे प्रमाणपत्र आम्ही गोविंदा पथकांकडून घेतले होते. जन्मदाखल्यानुसार संबंधित मुलगी १२ वर्षांवरील असल्याचा उल्लेख होता. उत्सवाच्या गर्दीत प्रत्येक गोविंदाची व्यक्तीशः तपासणी अशक्य आहे.''
- जीतेंद्र आव्हाड, संघर्ष प्रतिष्ठान

Balgovinda

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages