मुंबईच्या महापौर फक्त एका जातीच्या ? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2014

मुंबईच्या महापौर फक्त एका जातीच्या ?

आशिया खंडातील श्रीमंत व सर्वात मोठी अशी महानगर पालिका म्हणून मुंबई महानगर पालिकेची ख्याती आहे. अश्या सर्वात श्रीमंत आणि नावाजलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या सर्वोच्च अश्या महापौर पदी एका अनुसूचित जातीच्या महिलेला विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. एका अनुसूचित जातीच्या महिलेला महापौर पद मिळाल्याने सर्वच अनुसूचित जाती मधील लोकांना त्याचा अभिमान आहे. परंतू महापौरांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महापौरांच्या विरोधात अनुसूचित जाती मधील लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. महापौरांच्या विरोधात संतापाची लाट पसरण्याचे कारणही तसेच घडले आहे.

मुंबईच्या महापौरपदी एक अनुसूचित जातीची महिला विराजमान होणार हे जाहीर होताच अनुसूचित जाती मधील बौद्ध समाजातील यामिनी जाधव, डॉ. भारती बावदाने तसेच चर्मकार समाजातील स्नेहल आंबेकर यांचे नाव चर्चेत होते. शिवसेनेचे सर्व आदेश काढणारी "मातोश्री" सुद्धा बुचकळ्यात पडली होती. अखेर मातोश्री वरून महापौर पदासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी संदेश आला आणि स्नेहल आंबेकर यांचे नाव जाहीर करण्यात आले आणि महापौर पदी स्नेहल आंबेकर विजयी झाल्या. महापौर पदी अनुसूचित जाती मधील महिला असलेल्या स्नेहल आंबेकर या विजयी होताच सर्वाना आनंद झाला. 

दक्षिण मध्य मुंबई मधून लोकसभा निवडणुकीवेळी चर्मकार समाजाच्या राहुल शेवाळे यांना उमेदवारी देवून खासदार बनवल्याने महापौर पदी बौद्ध उमेदवाराला संधी दिली जाईल अशी अपेक्षा मुंबईकर आणि बौद्ध समाजातील लोकांची होती. परंतू बौद्धांच्या नेहमी विरोधात राहिलेल्या शिवसेनेने बौद्धांच्या अपेक्षा भंग केला आहे. शेवसेना कधीही जाती भेद करत नाही, शेवसेनेमध्ये जात बघितले जात नाही असे बोलले जात असले तरी शिवसेनेमध्ये किती मोठा जातीभेद केला जातो हे यावरून स्पष्ट दिसत आहे. स्नेहल आंबेकर यांनाही महापौर पद मिळताच त्यांनाही आपली जात आठवली असून त्यांनी सुद्धा जातीवरून राजकारण करणार हे स्पष्ट केले आहे. 

महापौर पदी विराजमान होताच स्नेहल आंबेकर यांच्यामध्ये मोठ्याप्रमाणात बदल झाला आहे. महापौर पदाच्या गादीवर बसताच त्यांनी आणि त्यांच्या पतीने पत्रकारांना भेटण्यास नकार दिला होता. नवीन महापौर म्हणून त्यांचाशी बोलून पत्रकारांना बातम्या आणि मुलाखती प्रसिद्ध करायच्या होत्या. परंतू महापौरांच्या पतीने नकार दिल्याने पत्रकारांमध्ये संताप पसरला होता. हा संताप महापौरांच्या खाजगी सचिवांच्या समोर मांडल्यावर विरोधात बातम्या येतील असे सांगितल्यावर महापौरांनी थोडा वेळ दिला पण त्यामध्ये पत्रकारांचे समाधान झालेले नाही आणि महापौरांच्या विरोधात बातम्या आल्या. 

महापौरांच्या विरोधात बातम्या येताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आणि महापौरांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. पत्रकार परिषदेमध्ये जनसंपर्क अधिकारी, पालिका वार्ताहर संघाचे स्वयंघोषित पदाधिकारी महापौरांच्या कानात उत्तरे सांगूनही महापौरांकडून पत्रकारांना हवी तशी उत्तरे मिळत नव्हती. महापौर या पत्रकार परिषदेमध्ये चांगल्याच गांगरलेल्या दिसत होत्या. जनसंपर्क अधिकारी आणि पालिका वार्ताहर संघाच्या स्वयंघोषित पदाधिकार्यांनी कानात खुसुर फ़ुसुर करूनही महापौरांनी मोठी चूक केली आणि आपण आपल्या कार्यकाळात आपल्या जातीसाठीच काम करणार असे पत्रकारांना उत्तर मिळाले. 

तुम्ही मागासवर्गीय आहात मागासवर्गीय समाजासाठी तुम्ही काय करणार, त्या साठी तुम्ही काय उपाय योजना करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मी चर्मकार समाजातून आली आहे. या समाजासाठी मी चांगली रूपरेषा आखेन आणि चांगल्या उपाय योजना करेल असे महापौरांनी उत्तर दिले आहे. या उत्तरावरून त्यांनी या पुढील आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात फक्त चर्मकार समाजाचाच विकास करण्याचे उद्धिष्ट समोर ठेवलेले दिसत आहे. महापौरांच्या या वक्तव्यामुळे अनुसूचित जाती बरोबर सर्वसामान्य जनतेमध्येही खळबळ माजली आहे. 

स्नेहल आंबेकर यांनी महापौर पदावर बसल्यावर केलेल्या भाषणावेळी ज्यांच्या मुळे महिलांना शिक्षण मिळण्यास सुरुवात झाली त्या महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, तसेच ज्यांनी भारताची राज्यघटना लिहिली आणि त्यामध्ये महिलांना हक्क निर्माण करून दिले त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आधी घेण्याचे टाळले होते. यावर विरोधकांनी आणि तमाम मागासवर्गीय समाजाने या प्रकाराचा निषेध केला आहे. आता महापौरांनी पुन्हा एकदा फक्त आपल्या चर्मकार जातीसाठीच वेगळी रूपरेषा तयार करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. 

महापौर पद हे एका चर्मकार जातीसाठी नसून ते समस्त अनुसूचित जातीसाठी राखीव आहे याचा विसर महपौर स्नेहल आंबेकर यांना पडला आहे. त्यांनी एका जाती पुरता मर्यादित राहून विचार न करता सर्व अनुसूचित जातीसाठी विचार करायला हवा. आज स्नेहल आंबेकर महापौर पदावर बसल्या आहेत ते त्यांच्या पक्ष प्रमुखांनी बसवले असले तरी राज्य घटनेमध्ये असलेल्या आरक्षणाच्या तरतुदींमुळे बसल्या आहेत हे विसरून चालणार नाही. आज राज्यघटनेमध्ये आरक्षणच  नसते तर आंबेकर या पदापर्यंत पोहोचल्या असत्या का याचाही विचार त्यांनी करण्याची गरज आहे. 

स्नेहल आंबेकर यांनी आपण काय बोलतो आणि त्याचे काय परिणाम होत आहेत याचा विचार करण्याची गरज आहे. आपण एका प्रतिष्ठित अश्या महापौर पदावर बसलो आहोत याचे भान आंबेकर यांनी ठेवण्याची गरज आहे. अनुसूचित जातीच्या असल्याने आपल्या कार्यकाळात नुसता आपल्या जातीसाठी विचार न करता अनुसूचित जाती बरोबरच सर्व मागासवर्गीय लोकांसाठी चांगले करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मुंबई महानगर पालिकेत शिवसेना भाजपच्या युती आणि आता रिपाई आल्यामुळे झालेल्या महायुतीच्या कार्यकाळात मागासवर्गीय कर्मचारी अधिकाऱ्यांची २० हजार पदे रिक्त आहेत. हि पद त्वरित भरण्याची आश्वासनं न देत कार्यवाही केली पाहिजे. 

महानगर पालिकेमध्ये मागासवर्गीय कर्मचारी अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत आहेत. वरिष्ठ अश्या मागासवर्गीय अधिकाऱ्यांना महत्वाच्या कामांपेक्षा दुय्यम असलेली कामे दिली गेली आहेत. अश्या मागासवर्गीय कर्मचारी अधिकाऱ्यांना महापौरांनी न्याय मिळवून देण्याची गरज आहे. मागासवर्गीय लोकांसाठी त्यांच्या लोकसंखेप्रमाणे बजेट मध्ये राखीव अश्या निधीची तरतूद करून घेण्याची गरज आहे. अनुसूचित जाती मधील महापौर असताना समस्त मागासवर्गीय जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम स्नेहल आंबेकर यांनी केले तरच या पदावर बसल्याचे सार्थक झाले असे म्हणता येईल नाहीतर महापौरांनी म्हटल्या प्रमाणे त्या एका जातीच्या महापौर असल्याचा संदेश मुंबईकर जनतेपर्यंत जाईल. 

अजेयकुमार जाधव (मो. ९९६९१९१३६३)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad