युती तुटणार नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 September 2014

युती तुटणार नाही

युतीत चाललेला अबोला अखेर छोटे ठाकरे म्हणजेच युवासेनाप्रमुख आदित्य यांनी चर्चेत उडी घेताच संपला आहे. भाजपचे निवडणूक निरीक्षक ओम माथूर यांच्याशी आदित्य यांनी चर्चा केली. त्यानंतर २५ वर्षांपासूनची युती अभेद्य राहणार, असे स्पष्ट संकेत आदित्य यांनी दिले. दरम्यान, भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची अंतिम फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी आज उशिरा रात्री मातोश्री निवासस्थानी पुन्हा बैठक होणार आहे. 

शिवसेना-भाजप युतीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार गुरुवारीच सर्व शिवसेना नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे हे काय भूमिका घेतात याची उत्सुकता ताणली गेली होती. उद्धव आज मीडियाला सामोरे जातील, अशीही अपेक्षा होती. मात्र, तसं काहीही झालं नाही. युती संपुष्टात आली आहे, आता केवळ घोषणा व्हायची बाकी आहे, अशा स्वरुपाच्या बातम्या आज दिवसभर फिरत होत्या. त्यातच भाजपने शिवसेनेचा ११९ जागांचा प्रस्ताव आम्ही कदापी मान्य करणार नाही, असं सांगून तणावात आणखीनच भर घालण्याचे काम केले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अचानक आदित्य यांची चाल शिवसेनेकडून खेळली गेली. 

माथूर यांच्याशी चर्चा केल्यानंतर आदित्य यांनी मीडियाशी बोलताना युती तुटणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. महाजन काका आणि शिवसेनाप्रमुखांनी बांधलेली युतीची मोट तिसऱ्या पीढीनेही पुढे न्यावी, अशी आपली अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्राला भ्रष्ट काँग्रेसपासून मुक्त करण्याचा आम्हा दोन्ही पक्षांचा मनोदय आहे. त्यापुढे फॉर्म्युला वैगेरे छोट्या गोष्टी आहेत', असेही त्यांनी ठासून सांगितले. आमच्याच कोणत्याही प्रकारचा इगो नाही. जे महाराष्ट्राच्या हिताचे आहे तेच शिवसेना करणार आहे. आजच्या चर्चेने पुन्हा नव्याने संवाद सुरू झाला आहे, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले. 

मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्याचा शब्द भाजपकडून मिळाल्याने चर्चा पुढे सरकली आहे का, असे विचारले असता आदित्य यांच्या चेहऱ्यावर सूचक हास्य दिसले. याप्रश्नावर थेट उत्तर न देता उद्धवजींनी महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्नं पाहिलं आहे. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेच त्यांच्यासोबत झोकून देणार आहोत, असे आदित्य म्हणाले. युवासेनेचे 'मिशन १५०' कायम राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आदित्य यांच्यासोबत शिवसेनेचे कावेबाज नेते सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई यांनाही धाडण्यात आले होते. 

शिवसेनेसोबत असलेली २५ वर्षांची युती आहे तशीच राहणार आहे. युती तुटल्याच्या बातम्या ही मीडियाने पसरवलेली कहाणी होती. त्यात कोणतेही तथ्य नाही. आम्ही आमचा प्रस्ताव शिवसेनेला दिलेला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, अशी अपेक्षा माथूर यांनी व्यक्त केली. 

Post Bottom Ad