२ वर्षांत ८0 अभियंत्यांचा पालिकेला 'रामराम' - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२ वर्षांत ८0 अभियंत्यांचा पालिकेला 'रामराम'

Share This
मुंबई ( जेपीएन न्यूज ) : 'सरकारी नोकरी म्हणजे रमतगमत काम' हे समीकरण मागे टाकणारी स्थिती सध्या बृहन्मुंबई महापालिका प्रशासनात दिसू लागली आहे. मागील दोन वर्षांत नगरसेवक, आरटीआय कार्यकर्ते तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दबावाला कंटाळून ८0 हून अधिक अभियंत्यांनी पालिकेला 'रामराम' ठोकल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

पालिकेच्या सर्वसाधारण प्रशासन विभागाने (जीएडी) ही माहिती उपलब्ध केली आहे. या उपलब्ध माहितीनुसार, एप्रिल २0१२ ते मार्च २0१४ या आर्थिक वर्षात ४0 अभियंत्यांनी तर २0१३-१४ या आर्थिक वर्षात ४५ अभियंत्यांनी पालिकेला रामराम ठोकला. पालिका प्रशासनाच्या कारभारात पारदर्शकता आली आहे. त्यामुळे एखादी चूक घडली की अभियंत्यांना जबाबदार धरले जाते. तसेच अलीकडच्या काळात आरटीआय कार्यकर्त्यांचाही प्रशासकीय कारभारात हस्तक्षेप वाढला आहे. या दबावाला कंटाळून नोकरी सोडणार्‍या अभियंत्यांचा टक्का वर्षागणिक वाढतो आहे. 

मागील दोन वर्षांत विशेषत: रस्ते विभागात अनेक बदल घडले. या विभागाचे माजी मुख्य अभियंता सतीश बडवे आणि डी. आर. दीक्षित यांनी स्वेच्छानवृत्ती स्वीकारली. त्याचबरोबर उपमुख्य अभियंता (पूर्व उपनगर) व्ही. जी. गोस्वामी आणि कार्यकारी अभियंता गिरीष पाटील यांनीही नवृत्ती स्वीकारली. कामाच्या व्यापाबरोबरच कनिष्ठांना जबाबदार धरण्याच्या वरिष्ठांच्या प्रवृत्तीला कंटाळून अभियंते पालिका प्रशासनाला रामराम ठोकतात, असे पालिका अभियंता संघटनेच्या एका वरिष्ठ पदाधिकार्‍याने सांगितले. दुसरीकडे, खाजगी क्षेत्रात अभियंत्यांच्या करिअरला मोठा वाव मिळत आहे. शिवाय, तणावमुक्त कामाचे समाधान मिळत असल्याने काही अभियंत्यांनी पालिकेची नोकरी सोडून खाजगी कंपन्यांचा मार्ग धरला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages